डॉ. विनया जंगले.
‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलंच नाही; झाडांची पोपटी पालवी..मला अधिक विश्वासार्ह वाटली – द. भा. धामणस्कर
प्रत्येक ऋतूत जंगलाचं एक वेगळं रूप असतं. परंतु चैत्रातील जंगल हे रंग, गंध आणि चैतन्याचा साज लेवून येतं. एरवी रूक्ष वाटणारं पांगाऱ्याचं काटेरी झाड पक्ष्याच्या चोचीसारख्या आकाराच्या शेंदरी रंगाच्या फुलांनी चैत्रात बहरून येतं. रंगांच्या या उत्सवात पिवळी फुलंही दिमाखात दाखल होतात. लिंबकांतीच्या बहाव्याचे झुंबर भरदुपारी कडक उन्हात डोळ्यांना थंडावा देतात. या पिवळ्या बहाव्याबरोबरच क्वचित कधीतरी गुलाबी बहावाही नजरेस पडतो..
आंब्याच्या झाडावर फाल्गुनात बहरलेला मोहर जाऊन कैऱ्या दिसू लागल्या, पिंपळाच्या झाडावर लालसर पोपटी पालवीचा साज चढला आणि प्रेमाने वेडा होऊन तप्त दुपारी कोकीळ कोकिळेला साद घालू लागला की लगेचच मन ओळखतं.. चैत्र आला!
प्रत्येक ऋतूत जंगलाचं एक वेगळं रूप असतं. परंतु चैत्रातील जंगल हे रंग, गंध आणि चैतन्याचा साज लेवून येतं. एरवी रूक्ष वाटणारं पांगाऱ्याचं काटेरी झाड पक्ष्याच्या चोचीसारख्या आकाराच्या शेंदरी रंगाच्या फुलांनी चैत्रात बहरून येतं. अंजनीचं छोटंसं झुडूप गडद जांभळ्या फुलांनी भरून जातं. अंजनीच्या फुलांच्या कडेलाच गुलाबी रंगाच्या मण्यासारख्या कळ्या फुलण्याच्या जणू प्रतीक्षेत रांगेत उभ्या असतात. अंजनीच्या झाडावरील फुलं आणि कळ्यांचा जांभळ्या गुलाबी रंगांचा संगम भरजरी रंगाच्या नीलमण्याप्रमाणे चमकत असतो. शेवरीच्या काटेरी झाडावर फाल्गुनात फुललेली गुलाबी लाल रंगाची फुलं गळून जाऊन शेंगा यायला सुरुवात होते. आता फुलण्याची पाळी कौशीची असते. कौशीचं उंचच उंच झाड झिरमिळ्यासारखी दिसणारी केशरी फुलं माळून चैत्राचा भगवा झेंडा फडकवत राहतं. कौशीची फुलं फुलली की या झाडांवर पक्ष्यांची लगबग सुरू होते. साळुंखी, चमकदार रंगाचे जांभळे सूर्यपक्षी, मुनिया या अशा अनेक पक्ष्यांची चिवचिव या झाडांवर सुरू असते. पक्ष्यांबरोबरच खारुताई चिक्चिक् आवाज करत कौशीच्या फुलांकडे झेपावताना पाहावयास मिळते. कौशीच्या भगव्या रंगात रंगून जावं तर पलीकडच्या डेरेदार वडाला लालचुटुक फळं आलेली असतात. टक्टक् आवाज करणाऱ्या हिरव्या रंगाच्या लाल मानेच्या तांबट पक्ष्यांची पंगत या झाडावर बसून फळांचा फडशा पाडत असते. रंगीत फुलं, फळं नाहीत म्हणून कुसुमाचं झाड अजिबात रुसून बसत नाही. ते आपल्या लाल- गुलाबी पालवीचा बहर अख्ख्या चैत्रात मिरवत राहतं. कुसुम फुलांच्या रंगाची पानं मिरवतं, तर उक्शीची वेल पानाच्या हिरव्या रंगाच्या असंख्य फुलांनी बहरून येते. उक्शीची फुलं कोमेजताना तपकिरी रंगाची होतात आणि वाऱ्याबरोबर भिरभिरत खाली पडत राहतात. फाल्गुनात फुललेल्या गुलाबी रंगाच्या ग्लिरीसिडीया किंवा उंदीरमारीचा बहर आता उतरणीला लागतो. परंतु गुलाबी रंगाची कमतरता भरून काढण्यासाठी जणू रेन-ट्री पावडर पफसारखी दिसणारी गुलाबी फुलं डोईवर लेवून अवतरतो. रस्त्याच्या बाजूला जागोजागी सावलीसाठी लावलेला हा परदेशी वृक्ष आज देशी वृक्षांच्या बरोबरीने चैत्रात मिरवत असतो.
लाल कुंकवाच्या बाजूला ठेवलेल्या हळदीप्रमाणे या रंगांच्या उत्सवात पिवळी फुलं दिमाखात दाखल होतात. लिंबकांतीच्या बहाव्याचे झुंबर भरदुपारी कडक उन्हात डोळ्यांना थंडावा देतात. या पिवळ्या बहाव्याबरोबरच क्वचित कधीतरी गुलाबी बहावा नजरेस पडतो. पिवळ्याधमक रंगाचा सोनमोहर फुलांची छत्री उघडून सावलीत विसावण्याचं जणू आमंत्रण देत असतो. पानांच्या हिरव्या आणि फुलांच्या पिवळ्या तुऱ्यांची नक्षी बहाव्याच्या शिरावर पसरलेली असते. मुंबईतील आरे कॉलनीत जागोजागी हे सोनमोहर नजरेस पडतात. सरत्या दुपारी सोनमोहराच्या पिवळ्या पाकळ्यांच्या गालिचावर बसून चैत्रातील जंगल न्याहाळण्याचं सुख काही औरच म्हणावं लागेल. गडद पिवळ्या रंगाचा बहावा आणि सोनमोहरासारख्या फुलांमध्ये फिकट पिवळ्या रंगाचा कुंभ काहीसा दुर्लक्षित राहतो. चैत्रापासून कुंभ फुलू लागतो. कुंभ म्हणजे पश्चिम घाटातील एक वैशिष्टय़पूर्ण वृक्ष. फाल्गुनात संपूर्ण निष्पर्ण झालेला हा वृक्ष चैत्रात केवळ फुलांनी बहरून येतो. नऊ-दहा से.मी. व्यासाचं फूल.. त्यात पिवळट रंगांच्या पाकळ्या आणि मध्यभागी पांढऱ्या रंगाचे धाग्यासारखे असंख्य मुलायम पुंकेसर कुंभाच्या झाडाचं सौंदर्य खुलवत असतात. कुंभाच्या फळांचा आकार मडक्यासारखा असतो, म्हणूनच याचं नाव ‘कुंभ’ पडलं असावं. पिवळ्या बहराचा विषय निघाल्यावर शिवणवृक्षाला विसरून कसं चालेल? मजबूत खोडाच्या या उंचच उंच वृक्षाच्या पानांचा आकार पत्त्यातील बदामासारखा असतो. चैत्रात जंगलातून फिरताना पायतळी पिवळी फुलं दृष्टीस पडतात. आपसूक नजर बाजूला फिरते तेव्हा काळसर रंगाचं शिवणाचं मजबूत खोड दृष्टीस पडतं. याच्या फुलांचा आकारही वेगळाच. चार पाकळ्या एका बाजूला आणि पाचवी पाकळी या उरलेल्या पाकळ्यांवर फणा उभारल्यासारखी दुसऱ्या बाजूला दिसत राहते. परसदारात लावलेल्या पपयांवरील फळं चैत्राचं ऊन लागलं की पिवळीधम्मक होऊन जातात. त्यांच्या गोड वासाने मोहित होऊन आलेली कोकिळा पिवळ्याधम्मक पपयांवर टोचा मारताना दिसत राहते.
रंगांच्या या उत्सवात गंधांचं लेणं लेवून काही फुलं चैत्रात फुललेली असतात. चकचकित हिरव्या पानांचं करवंदाचं काटेरी झुडूप आपल्या चांदण्यासारख्या पांढऱ्या फुलातून गंधाचं लेणं आसमंताला देत असतं. चैत्राच्या शेवटी शेवटी या फुलातून हिरवी मण्यासारखी करवंदं डोकावू लागतात. करवंदाप्रमाणे आणखी एक फूल आपल्या गंधाने आसमंत धुंद करत असतं. ते म्हणजे कुडय़ाचं. करवंदाच्या फुलाचा रंग कापसासारखा पांढराशुभ्र, तर कुडय़ाचा पिवळट पांढरा. कुडय़ाचं झुडूप करवंदापेक्षा मोठय़ा आकाराचं. कोकणात कुडय़ाच्या फुलांची भाजी चैत्रात हमखास खाल्ली जाते. कुडय़ाच्या फुलांनी ईस्टरच्या रविवारी चर्चची सजावट होते, तर देवळाच्या बाजूला असलेला चाफा चैत्रात देवळाच्या अंगणात मंद सुगंधाची बरसात करत राहतो.
वनस्पतीमध्ये ज्याप्रमाणे रंग-गंधांची मैफल जमलेली असते, त्याचप्रमाणे कित्येक पक्ष्यांचाही हा विणीचा हंगाम असतो. कावळे, चिमण्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू असते. पिवळ्याधम्मक रंगाचा हळद्या ऐन दुपारी आंब्याच्या झाडावर बसून प्रियतमेला साद घालत राहतो. चमकदार तपकिरी रंगाचे पंख असलेल्या पाकोळ्या आपल्या चोचीतून चिखल आणून मातीचं घरटं बांधत राहतात. सरत्या चैत्रात कोकिळा कावळ्यांच्या घरटय़ात अंडी घालण्यासाठी धडपडू लागतात. जंगलातील हरिणी आपली फाल्गुनात जन्माला आलेली पाडसं सोबत घेऊन कोवळ्या पालवीवर ताव मारत असतात. माकडीणी आपली नवजात पिल्लं घट्ट पकडून पिंपळाच्या झाडावर दुपारी विश्रांती घेत असतात.
हळूहळू निसर्गाचं रूप पालटतं. ताम्हणीचे निळे-जांभळे तुरे सरत्या चैत्रात वाऱ्यावर डोलू लागतात. ऊन तापू लागतं. प्राणी पाण्याच्या शोधात फिरू लागतात. बहराचा चैत्र संपून तप्त वैशाखाची चाहूल लागते..
vetvinaya@gmail.com
Ref : loksatta


No comments:
Post a Comment