‘‘ जखमी कुत्री फक्त रात्री बाहेर पडतात म्हणून रात्री-बेरात्री त्यांच्या उपचारांसाठी रस्त्यांवर फिरणारी ती, प्राण्यांचा डॉक्टर असलेल्या मित्राकडे जाऊन सलाईन देणं, जखम साफ करणं मुद्दाम शिकून घेणारी ती, टाळेबंदीमध्ये दररोज रस्त्यावरच्या दोनशे कुत्र्यांना जेवायला घालणारी ती, जखमी गाय-वासरू, रस्त्यावरचा घोडा, कासवं, जखमी कावळे, घुबडं, वटवाघळं, मासे.. या सगळय़ांची काळजी घेणारी त्यांची आऊ, अमूर्त चित्रकार आणि माझी बायको राजश्री करकेरा-आपटे. कर्करोगानं गेली, पण मरणापूर्वीही एक महत्त्वाची गोष्ट तिनं मला करायला सांगितली.. तिच्यासाठी मी तीही केली.. ’’ सांगताहेत चित्रकार, लेखक, पत्रकार आशुतोष राम आपटे.
‘‘टिटन टिटन अलेले ररले टिटन टिटन.. ’’ राजश्रीनं असंच आपलं हे बनवलेलं गाणं गायलं की आमची संयुक्ता आनंदानं नाचत नाचत येते. राजश्री म्हणजे चित्रकार राजश्री करकेरा-आपटे. माझी पत्नी. आज राजश्री हयात नाही. अलीकडेच गेली ती. पण कदाचित संयुक्तासाठी हे गाणं म्हणजे राजश्रीला, तिच्या आऊला स्वरांतून भेटणं असेल. संयुक्ता ही गोल्डन रिट्रीव्हर प्रजातीची कुत्री. आमची मानसकन्या जान्हवीची नात.
जान्हवी तर भलतीच गोड कुत्री होती. १८ सप्टेंबर २०१६ ला पहाटे सव्वाचारला ती गेली. पण आजही आमच्या सफाळय़ातील कित्येक जण तिची आठवण काढतात. राजश्रीला लाडाची टोपणनावं ठेवायची भारी हौस होती. जान्हवीलाही ती ससा म्हणायची. ‘‘ससाजान ससाजान.आऊची ससाजान’’, असं म्हटलं की जान्हवी मटकत मटकत आऊकडे जायची. जान्हवी कायम माझ्याबरोबर मोटारसायकलवर असायची. लहान मुलासारखी पुढे बसून नॉनस्टॉप मुंबईपर्यंत यायची. तसे इथं मला शेजारचेही ओळखत नाहीत. मात्र कुत्रा मोटारसायकलवर बसून येतो ही माझी ओळख अख्ख्या पंचक्रोशीत आहे. गाडी चुकून स्पीडब्रेकर किंवा खड्डय़ातून जोरात नेली, तर ही लगेच तिचा पंजा माझ्या हातावर ठेवायची. जणू सांगायची, की ‘ए बाबा, नीट चालव जरा गाडी.’ केळवे बीचला जान्हवी माझ्याबरोबर उंटावरही बसली आहे. ‘आऊ कुठे आहे?’ विचारलं तर बरोबर राजश्रीला शोधून काढायची. माझ्याबरोबर तर नेहमीच लपंडाव खेळायची. मी दरवाजाआड, गवतात कुठेही लपायचो आणि ती मला बरोबर शोधून काढायची. मी दिसत नाही तोवर तिचा जीव कासावीस व्हायचा. ती दिसली नाही की अर्थात माझ्याही काळजाचा ठोका चुकायचाच. एकदा नेहमीप्रमाणे आम्ही मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून जंगलात फिरायला गेलो होतो. अन् तिची माझी चुकामूक झाली. मी भलत्याच वाटेनं जान्हवी जान्हवी ओरडत तिला शोधत फिरत होतो. शोधून शोधून पुन्हा परतीच्या रस्त्यानं मागे फिरलो आणि बघतो तर ही शहाण्यासारखी मोटारसायकलजवळ येऊन थांबली होती. मी वैतागलो, तिच्यावर ओरडलो, म्हणालो, ‘‘जान्हवी काही अक्कल आहे का तुला? किती शोधत होतो मी तुला?’’ तिनं शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि हळूच माझा हात चाटला. जणू म्हणत होती, ‘‘अरे बाबा, किती रे वेंधळा तू.. आपण हरवलो तर गाडीपाशी येऊन थांबायचं नं.. कशाला इकडे तिकडे शोधत फिरायचं?’’ तिला पोहण्याचंही भारी वेड होतं. समुद्रात, ओहळावर, तळय़ात, धबधब्याखाली सगळीकडे मनसोक्त पोहली आहे ती. ती गर्भार असतानाही तिला आम्ही जवळच्या एका डोहात रोज पोहायला घेऊन जायचो. पण प्रसूतीच्या दिवशी राजश्री आणि मी तिला घेऊन जात होतो, तेव्हा मात्र मागे फिरली. माझा हात तोंडात धरला आणि पुन्हा घराकडे वळली. त्या रात्री मी त्याच खोलीत थांबलो होतो. भुवन आणि रावडी या दुसऱ्या दोन कुत्र्यांना घेऊन राजश्री बाहेरच्या हॉलमध्ये होती. आम्हाला भीती वाटली, की ते जन्मलेल्या पिल्लांना काही करतील अशी. जान्हवीचं पहिलंच बाळंतपण होतं नं, म्हणूनही काळजी घेत होतो. पण झालं उलटच. मला डुलकी लागली आणि दरवाजावर रावडीचा उं उं असा आवाज आला.. त्याला बाहेरूनही कळलं होतं की पिल्लू जन्मलं म्हणून. त्याच्या आवाजानं मी जागा झालो. बघतो तर एक पिल्लू जन्मलं होतं. आणि जान्हवी त्याला चाटत होती. पहाटेपर्यंत जान्हवीनं नऊ पिल्लांना जन्म दिला. पुढे पुढे रावडीच त्या पिल्लांना सांभाळत असे आणि जान्हवी पिल्लांना घरी सोडून, माझ्याबरोबर भटकायला तयार असे. उत्तरा, अंतरा, अंजना, तारका, नभा, आयुध, तस्कर व निओ ही तिची पिल्लं आमच्याबरोबर होती. आमच्या नवीन घराचं नावही आम्ही ‘जान्हवीचे घर’ असंच ठेवलं आहे. माझं (‘आपटय़ाची पानं’) हे पुस्तकही जान्हवीलाच अर्पण केलंय. अर्थात पुस्तकातलं अक्षरही वाचता आलं नाही तरी तिच्या बाबाच्या मनातलं अक्षरन् अक्षर तिला वाचता येत होतं!
खरं म्हणजे या मुक्या प्राण्यांएवढं अफाट निव्र्याज प्रेम आम्हा मनुष्यांना नाहीच करता येत. कसं आहे, की आम्हा मनुष्यांना ‘प्रायोरिटी’ नावानं खूप काही असतं. आम्हाला इतर नाती असतात, ‘कमिटमेंट’ वगैरे असतात. पण प्राण्यांना आपल्याशिवाय जग नसतं. त्यांचं जे काही असतं ते सगळं आपल्याभोवती गुंफलेलं असतं. भूक लागली की जेवायचं. झोप आली की झोपायचं आणि मरण आलं की मरायचं. बाकी आयुष्यभर फक्त प्रेम करायचं इतकी साधी फिलॉसॉफी असते त्यांची!
आता जरी कुत्र्यांबद्दल मी भरभरून बोलत असलो, तरी मुळात मी कुत्र्यांना खूप घाबरतो. पूर्वी तर मी रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या भीतीनं रात्री उशिरा घरी परतायला घाबरायचो. रात्र रात्र रेल्वे स्टेशनवर बसून राहायचो. पहाट झाली, माणसांची वर्दळ सुरू झाली की मगच घरी जात असे. आज आता मी सफाळे स्टेशनला जातो तेव्हा ‘आटो’ ही रेल्वे अपघातात एक पाय कापला गेलेली, तीन पायांची काळी कुत्री प्लॅटफॉर्मवर मला सोडायला येते. तिच्याबरोबर आणखीही एक-दोन कुत्री असतातच. गाडी सुटेस्तोवर ती थांबतात. माझ्यात एवढा बदल घडला तो राजश्रीमुळेच.
सर ज. जी. कला महाविद्यालयात आम्ही, मी आणि राजश्री दोघेही चित्रकला शिकलो. तिच्याशी माझा प्रेमविवाह झाला आणि मग तिच्या कुत्र्यामांजरांचं मंगळसूत्र माझ्या गळय़ात पडलं. मीही अग्निसाक्षीनं त्यांचा प्रेमळ बाप झालो. मुंबईत विलेपाल्र्याला. तिच्या वडिलांचं पाच गुंठे जागा असलेले बैठं घर सफाळय़ात होतं. तिथे लक्ष्मी, ऐश्वर्या, श्वेता, मंथन, भुवन आणि खतरनाक रावडी अशी सहा कुत्री होती. नुकतंच आमचं प्रेम उमलत होतं. तिला भेटायला मी सफाळय़ात आलो होतो. तिला भेटणार यापेक्षा तिच्या या सहा कुत्र्यांच्या भीतीनं माझं काळीज वरखाली होत होतं. प्रेयसीचा भाऊ पैलवान वगैरे असू शकतो हे ऐकून होतो, पण प्रेयसीचे दात दाखवून गुरगुरणारे सहा कुत्रे हे प्रकरण पचायला जडच होतं. राजश्रीनं गेटमधून मला घरात घेतलं व कुत्र्यांना ओढत वगैरे आतल्या खोलीत नेऊन ठेवायला गेली. पण नेमका तो रावडी- जो सगळय़ात खतरनाक आणि चावरा कुत्रा म्हणून प्रसिद्ध होता तो बाहेर हॉलमध्येच राहिला होता. राजश्री म्हणाली होती, भुवन खूप प्रेमळ आहे. जरा डोक्यावरून हात फिरवला की सारखा येऊन चिकटतो. मला त्या वेळी रावडी कोण भुवन कोण हे कुठे माहीत होतं? मी आपलं डेअिरग करुन प्रेमळ भुवन समजून रावडीच्याच डोक्यावरून हात फिरवत होतो. रावडीला माझं उतू जाणारं प्रेम कळलं की काय कुणास ठाऊक. त्यानं मला काहीच केलं नाही. बहुतेक हा राजश्रीसाठी तिच्या कुत्र्यांना मला ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम होता. त्यांनी मला पसंत केलं तेव्हा ती माझ्याशी लग्नाला तयार झाली.
लग्नानंतर आम्ही मीरारोडला राहात होतो. नुकतंच लग्न झालेलं आणि राजश्री कधी कधी रात्री एक-दीड वाजता बिल्डिंग उतरून रस्त्यावरच्या जखमी कुत्र्यांवर उपचार करायला जायची. मग तिच्या काळजीपोटी तिच्याबरोबर मलाही जावं लागायचं. मी चिडायचो, तिला म्हणायचो, ‘‘दिवसा काय ते उपचार कर ना. इतक्या रात्री काय?’’ पण नंतर मला कळलं, जखम झालेले, जखमेत किडे पडलेले कुत्रे दिवसा लपून असतात. कारण वास येतो म्हणून लोक हाकलतात आणि दिवसा जखमेवर बसणाऱ्या माशाही खूप त्रास देतात. म्हणून ते बिचारे रात्री उशिराच कचराकुंडीत खाणं शोधायला बाहेर पडतात. राजश्री ही अशी मुलखावेगळी होती. पुढे आम्ही रत्नागिरीत आठ महिने खास एक बंगला भाडय़ानं घेऊन राहिलो होतो. कारण तिथे डॉ. अविनाश भागवत हा माझा जवळचा मित्र प्राण्यांचा डॉक्टर आहे. राजश्री रोज त्याच्या दवाखान्यात जाऊन, त्याच्याकडून प्राण्यांवर उपचार करायला शिकली. अगदी सलाईन देणं असो, जखम साफ करणं असो, की छोटं मोठं आजाराचं निदान असो. प्राण्यांच्या बाबतीतलं खूप सारं ती तिथे शिकली. त्याचा उपयोग तिनं रस्त्यावरच्या कुत्र्यांना बरं करण्यासाठी केला.
राजश्री आमच्या पिढीतील नवं काही करणारी आघाडीची चित्रकार होती. अमूर्त चित्रकार म्हणून प्रसिद्धही होती. पण रस्त्यावर, गटारात कुठेही कुत्र्यांवर उपचार करताना तिनं कधी बाऊ केला नाही. मुंबईत ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ला वर्गात चित्र काढताना एक जखमी घुबड तिच्याजवळ येऊन बसत असे. त्याच्यावर तिनं प्राण्यांच्या डॉक्टरांकडून उपचार करवून त्याला बरं केलं होतं. ‘जेजे’तली जखमा झालेली दोन मांजरंही तिनं बरी करून विलेपाल्र्याला तिच्या घरी नेली होती. तिच्या मदतीला तेव्हा तिच्या वर्गातला संजय सावंत असायचा.राजश्रीनं ही प्राणिप्रेमाची दीक्षा अनेकांना दिली होती. तिचा मोठा भाऊ कमल करकेरा यालाही राजश्रीमुळे प्राण्यांची गोडी लागली. आजुबाजूच्या भटक्या कुत्र्यांचं पोट तो भरतो. मी घरी नसेन त्या वेळी आमच्या इथल्या कुत्र्यांचं संगोपन करायला तो येतो. अन् तो असला की मीही निर्धास्त असतो. असाच आमचा मकरंद खेडेकर. राहातो मुंबईत दादरला. तिथे तो जिम ट्रेनर आहे. पण वेळ पडेल तेव्हा इथे येतो कुत्र्यांची काळजी घ्यायला. मकरंदची पत्नी वैशाली बने राजश्रीची मैत्रीण होती. ती होती मुंबईची. तिनं तर आमच्या घरापासून दहा किलोमीटरवर वेढी गावात मांजरी आणि कुत्र्यांसाठी घर बांधलं होतं. ती कर्करोगानं वारली. तशी तिची कुत्री-मांजरी आमच्या घरी आली. आज इथे पालघर जिल्ह्यातील गिराळे गावात आमच्याकडे संयुक्ता, सावरी, सुखी, गौतमी, वीरांगना, चिरकुट, चिकू, चिमणी, लेडी मायकेल, बबीता, हिडिंबा, कॅस्पर, कानफाटय़ा, गणपत, झिंगा, मोती, रायबा असे १७ जण आणि दोन बोके आहेत. यातले बरेचसे रस्त्यावरचे, किंवा काहींना अडचणीतून सोडवून, आमच्या घरी आश्रय दिलेले आहेत. सावरीला दिल्लीत एका पिंजऱ्यात कोंडून ठेवलेलं होतं म्हणून, ट्रेनच्या फस्र्ट एसी मधून राजश्री तिला घेऊन आली होती. बबिता लहानपणी कोणा गाडीच्या अपघातात एका नाल्यात तीन दिवस पडून होती. राजश्रीला कळलं तेव्हा ती तिला घेऊन आली. झिंगा कित्येक महिने झोपूनच होता. आता गोल गोल फिरत चालतो थोडाफार. गणपत रेल्वे स्टेशनवर एक पाय कापलेल्या अवस्थेत पडून होता, आता आनंदात तीन पायांवर जगतो आहे.
स्वप्निल तावडे हा मर्चंट नेव्हीतला कॅप्टन. अमेरिकन बुली प्रजातीची सुखी त्याच्याकडची. पण तो समुद्रात असताना सांभाळणार कोण, म्हणून मोठय़ा विश्वासानं त्यानं आमच्याकडे ठेवली आहे. प्रत्येकाचं एक कथानक आहे. प्रत्येकाची एक दर्दभरी फाईल आहे. पण आता ती आमची आनंदी बाळं आहेत. आणखीही खूप जणं आली, नांदली. प्रेम दिलं आणि काळाच्या पडद्याआड गायब झाली. ‘योध्दा’सारखा रस्त्यावर सोडून दिलेला अवाढव्य ग्रेट डेन होता. जो राजश्रीलाच दोन वेळा हातभर चावला होता. पण त्यालाही तिनं प्रेमानं सांभाळलं. जर्मन शेफर्ड वीरांगना होती. कारच्या पुढच्या खिडकीतून ती थेट उडी मारून माझ्या बाजूच्या सीटवर बसायची. हरवून सापडलेली सैरन्ध्री नावाची पग होती. जी सफाळय़ात हरवली होती आणि मुंबईत बोरिवलीला सापडली होती. आंधळी आषाढी होती. लाजरा आषाढ होता. चिडखोर रुस्तम होता. प्रेमळ दगडू( रॉकी) होता. पांढरे सॉक्स घातल्यासारखा पांढऱ्या पायांचा काळा मोजा होता. खूप कमी जगलेला आवा होता. अनेक अनामिक तात्पुरते येऊन गेले. आमच्याकडे गाय वासरूही येऊन बरे होऊन गोशाळेत गेलेत. रस्त्यावरचा घोडा टेम्पोत घालून मी आणि राजश्रीनं कर्जतच्या एका आश्रयस्थळी नेऊन दिला. कासवंही होती. जखमी कावळे होते. घुबडं होती. वटवाघूळ, मासेही होते.
खूप पूर्वी एक नाग घरात आला होता. तेव्हा प्रकाश वाघमारे आणि राजश्रीनं तक्क्याच्या कापडी आवरणात, हँडमेड पेपरचा रोल टाकून त्यात कसंबसं पकडलं. प्रकाश सायकल चालवत होता. राजश्री पाठी कॅरियरवर तो नाग घेऊन बसली होती. त्याला जंगलात सोडून आले. इथेही एक साप तिनं पाण्याच्या बादलीत पकडला आणि बाहेर सोडताना दगडाला अडकून सापासहित हीच पडली. नशीब तो साप हिच्या गळय़ात नाही पडला. डास, गोचीड सोडली तर ही कुणालाही मारू देत नसे. कोळय़ाच्या जाळय़ात अडकलेली फुलपाखरंही ही मला सोडवायला लावायची. टाळेबंदीमध्ये चायनीज गाडय़ा आणि हॉटेल्स बंद होती. मग रस्त्यावरचे कुत्रे काय खाणार, म्हणून ही दररोज रात्री गाडीत मोठमोठी पातेली घेऊन २०० कुत्र्यांना वाढायला जायची.
कर्करोगामुळे २९ डिसेंबर २०२१ ला दवाखान्यात स्वत: गंभीर अवस्थेत असताना रात्री एक वाजून ४० मिनिटांनी तिनं मला सांगितलं, ‘‘आशु, मी मरणार आहे. पण आता मी आहे तोवर मी मेल्यावर काय करायचं ते माझ्याशी बोल.’’ मी विचारलं, ‘‘कुत्र्यांची काळजी वाटते का?’’ तर ती म्हणाली, ‘‘नाही तू सांभाळशील त्यांना. पण मी मेल्यावर माझं प्रेत त्या सगळय़ांना बघू दे. म्हणजे वाट नाही बघणार ते माझी कधी. त्यांना कळेल आपली आऊ गेली म्हणून. आणि माझं देहदान नाही झालं तर लाकडांवर जाळू नकोस मला. इलेक्ट्रिक किंवा गॅसवर चालणाऱ्या स्मशानातच जाळ. दहावं-बारावं काही करू नका माझं. पैसे खर्चच करायचे तर सफाळय़ातल्या रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी काही करा. ’’
माझा होकार ऐकताच त्या दिवशी लहान मुलाचं निरागस हसू ओठांवर ओसंडत शांत झोपली ती. पाच जानेवारीला रात्री गेली ती. तिचा मृतदेह मुंबईहून गिराळेला आणला. तिच्या बाळांना वासानंच कळलं असणार, त्यांची आऊ गेली म्हणून. हिडिंबा पहाटभर तिच्या बाजूला बसून होती. सुदैवाने नायर रुग्णालयानं कर्करोग असूनही तिचं देहदान स्वीकारलं. तिची अंतिम इच्छा पूर्ण झाली. अमूर्त चित्रकार होती ती. शरीराच्या मूर्त कुडीतून अमूर्त झाली. दोन पायांच्या देहातून निघून खूपशा चार पायांच्या हृदयात विसावली. पण आजही, अगदी आत्ताही दिसते ती. कुत्र्यांच्या निरागस डोळय़ातून लुकलुकत. शेवटी तिची ही चार पायांची बाळं हाच तर आता माझ्या जगण्याचा आधार आहे.
ashuaptejj@yahoo.com
Ref: Loksatta


No comments:
Post a Comment