Amazon

Saturday, September 18, 2021

गाभाऱ्यातला घुमारा अर्थात स्वसंवाद

 प्राजक्त देशमुख या ताज्या दमाच्या तरुण नाटककाराच्या ‘सं. देवबाभळी’ या नाटय़कृतीस नुकताच युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने दस्तुरखुद्द लेखकानेच ‘देवबाभळी’च्या निर्मितीप्रक्रियेचा घेतलेला उत्कट धांडोळा..

गाभाऱ्यातला घुमारा अर्थात स्वसंवाद

मला आठवतं, साधारण पहाटेचे चार वाजले होते. तुला हलक्या हातांनी वाजवलेल्या चिपळ्यांचा आवाज आला. उठण्यापेक्षा अंथरुणाच्या आतून डोळे किलकिले करून बाहेर काय चाललंय हे पहायचं तू ठरवलंस. पंचाहत्तरीतले आजोबा आणि त्यांचे गुरूमित्र चातुर्मासाच्या वारीला जाण्याच्या निमित्तानं नेहमीप्रमाणे आले होते. पहाटेचा हरिपाठ चालू होता. खोली अंधारी होती. पसरलेल्या घोंगडीसमोर पितळी रखुमाई-पांडुरंगाच्या मूर्ती. ग्रामीण पेहरावातली दोन म्हातारी माणसं त्या अंधुकशा खोलीत हरिपाठ म्हणत होती. एक जण म्हणायचा, दुसरा त्याच्या पाठोपाठ म्हणायचा. असं दोन-दोनदा कानावर येत होतं. तू उठायची तसदी घेतली नाहीस. मुद्दामच. उठला आणि त्यांनी सोबत हरिपाठाला बसवून घेतलं तर? उदबत्तीच्या धुराकडे आणि अग्निटिंबाकडे बघत बघत कधीतरी तुझा डोळा लागला.

मला अजून आठवतं, तू लहानपणी पंढरपूरला गेला होतास तेव्हा आईला विचारलं होतंस, ‘सगळीकडे जोडीने दिसतात ते विठू-रखुमाई इथं वेगळे कसे?’ आईनं सांगितलं, ‘ती रुसलीय!’ तेव्हा तुझ्या एखाद्या फांदीला वर्षांनुवर्ष लगडलेल्या मोहोळावर दगड पडला. ‘देव असून हे रुसणं?’

मला आठवतं, तू देहूला गेला होतास तेव्हा विचारलं होतंस.. ‘या तीन डोंगरांपैकी नेमक्या कोणत्या डोंगरावर तुकोबा गेलेत हे आवलीला कसं कळायचं?’ तेव्हा एका स्थानिकाचं भाबडं उत्तर आलं होतं, ‘पावलांच्या ठशांना ती कान लावायची.. ज्यातून विठूनाम ऐकू येतंय त्या ठशांमागे ती जायची.’ यावर माझा प्रश्न : ‘एवढय़ा ठशांत तोच ठसा ती कशी ओळखायची?’ त्यावर त्याहून भाबडं उत्तर आलं, ‘जोडीदाराचं पाऊलही ओळखता येत नसेल तर तो कसला जोडीदार?’

खरं-खोटं मरू द्या, पण ही कविता आहे असं तुला वाटलं. नंतर भंडारा डोंगर चढताना विचार आला : तुकोबा जाता जाता सांगून जाता तर? नंतरही त्या भंडाऱ्यावर बरेच विचार घेऊन तू भटकलास. बऱ्याच दगडांवर बसून पाहिलंस, बऱ्याच काटेरी झाडांकडे कुतूहलानं पाहिलंस. पुढे डोंगराचा अर्धा माथा दगड-विटांनी व्यापला होता. तुकोबाच्या मंदिराचं काम चालू होतं तिथं. आपल्या लोकांना जे होतं ते तसंच जतन करणं हा प्रकार माहीतच नसेल का? जिथं कुठं त्या जिजामाऊलीनं तुकोबांसाठीची शिदोरी सोडली असेल ती जागा आता सिमेंट-दगडाखाली गुदमरून जाणार का? ते नेमकं कोणतं झाड असेल, ज्याच्या खाली हे जोडपं बसत असेल?  ‘धाला आणिकांची नेणे तान भूक’ लिहिणाऱ्या तुकोबांनी जिजेला एखादा घास भरवला असेल का? हे असले सगळे विचार करत असताना तू डोंगरभर हिंडला होतास. बेभान वारा होता. मग एका कठडय़ाशी जाऊन बसलास. तुकोबा असेच बसले असतील का? समोर खोल दरी. मित्राला सांगून फोटो काढलास. ‘तू तुकारामासारखा का बसलाहेस? त्याला विमान आलं म्हणे.. तुला चिठ्ठी तरी येईल का पाप्या?’

तू उठलास.

मला आठवतं, तू पंढरपूरला गेला होतास. खूप गर्दी होती. पुढं एक म्हातारी. जख्ख. रखवालदार ढकलत होता. म्हातारी रडवेली झाली. ‘लय दुरून आलेय रे.. थोडं आजूक पाहू दे.’ तिच्या त्या आर्जवानं तुझे डोळे भरले. तू रखवालदाराला म्हणालास, ‘थांब थोडं.’ आणि तू बाजूला झालास.. ‘माझा वेळ तिला दे’ या अर्थानं. नंतर पाषाणी खांबाला जाऊन टेकलास. कोण होती ती म्हातारी? कशाला रडायचं उगा इतकं? तिनं रखुमाईला भेटावं की कडकडून! आपले प्रश्न बाप सोडवत असला, तरी आईला ते कळतात. ती म्हातारी हसत निघून गेली. तिच्या डोळ्यांतलं पाणी तुझ्या डोळ्यांत. गार पाषाणी खांब. गार पाठ. गरम अश्रू.

मला आठवतं, तुला प्रश्न पडायचे : विठ्ठलाचं काय? कृष्णाची तुरुंग ते जरा गोष्टय. रामाची अयोध्या ते शरयू गोष्टय. मग विठ्ठलाची गोष्ट काय? रखुमाईची काय? रुसलीय ती. का? राही सवे देवा, सांग काय तुझं नातं? कोण राही? राधा. कोण विठ्ठल? कृष्णरूप. ही काय मिथकं आहेत सगळी? रखुमाई म्हणजे विठ्ठलाची बायको. आवली म्हणजे तुकोबाची बायको. ‘अमक्याची बायको’ ही कसली ओळख? छय़ा! बरं, दोघींना आपापल्या नवऱ्याशी तक्रार आहेच. कोणाची नसते? संसारात थोडय़ाफार कुरबुरी असतातच. पण युगं लोटली, काळ लोटला. मग राईचा डोंगर झाला का? पण तक्रार होतीच की. ते सत्य आहेच. पुढं ह्य़ांचीच व्यक्तिमत्त्वं इतकी मोठी झाली की त्यांच्या मागे लांबच लांब सावल्या पडल्या. त्या सावलीत कुणी डोकावलंच नाही? तिथं कोण होतं? या दोघी. मग त्यांना कुणीच काही कसं विचारलं नाही? तू विचारलंयस कधी तुझ्या आईला? जेवलीस का? मग त्यांना कसं कोण विचारणार? आपण विचारू या? विचारलं. पांडुरंगानं आवलीच्या पायातला काटा काढला. बाभळीचा काटा. देवानं काढला. की देवाचा काटा? की देव हाच काटा? देवत्वाचा काटा? खरं-खोटं कोण जाणे, पण देवानं काढला काटा. हं! त्याआधी रखुमाईचा रुसवा काढला असता तर..? बरं, आवलीचा काटा आपल्या नवऱ्यानं काढला आहे हे जर रखुमाईला कळालं तर? आपला नवरा दुसऱ्या बाईचा पाय हाती घेतो? पदर खोचून गेलीच असेल ती पहायला.. ‘कोणे ही बया!’ रखु रुसली. लखु झाली. आहे ते मंदिर पंढरपूरला. लखु गेली भांडायला आवलीशी तर..? आवली कावली आहेच टाळकुटय़ा नवरोबावर. आणि तुकोबानं भांडण मांडलंयच पांडुरंगाशी. भांडणाचा चौकोन. निमित्त : काटा. देवबाभळी. सगळेच एकमेकांवर रुसलेयत. हा चौकोन दिसला तुला. तू तो मांडायचं ठरवलंस. सगळेच जखमी. सगळेच काटे. कुणाकुणाच्या जखमा भरल्या? आवली आणि लखु यांना कशाला भेटवायचं? एकमेकींची गळाभेट करायला..? कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ.. नकोच. भेट हाच हेतू. मग जाऊ द्यायचं ठरलं तुझं.. त्यांना त्यांच्या वाटेनं जायला!

मला आठवतं, तुला एकदा वाटलं- नसेल आवलीला वाचता येत, पण तुकोबांचे अभंग इतके प्रसिद्ध- की प्रत्येकाच्या तोंडी.. घराबाहेर, मंदिरात, कीर्तनात तेच अभंग. मग आवलीला ‘तुका म्हणे घरीं। माझें कोणी नाहीं हरी। नका करूं दुरी। मज पायां वेगळें’ हे नेमकं कधी कानी पडलं असेल का? असं लिहितात तुकोबा? माझे कोणी नाही? याला काय अर्थय्? मग इतकी वर्ष काय भंडाऱ्याची माती खाऊन जगले? आवलीला नसेल आला असा राग? कळ नसेल आली दाटून? किंवा तुकोबांना असेल खरंच वाटत असं.. तर निदान जाऊन विचारावंसं नसेल वाटलं तिला? त्यांनी तिला लिहायला शिकवलं असतं तर..? तिच्या अभंगांत काय असतं? ती का नाही रुसली? रुसली होतीच की! रखुमाईसारखी. पण पद्धत वेगळी.

मला आठवतं.. मग प्रत्यक्ष तुझं नाटक आलं. आणलं प्रसाद दादानं. तालीम. रंगीत तालीम. नाटक. पहिली घंटा ते तिसरी घंटा. माझ्या बॅकस्टेजला चौऱ्यांशी लक्ष येरझारा. टाळ्या. पडदा. कौतुक झालं. खूप कौतुक. मग पारितोषिके. खूप पारितोषिके. पण अनुषंगाने पडले होते ते प्रश्न..? सुटले? नाही. उत्तरं मिळाली..? नाही. प्रश्न छान मांडला म्हणून हे सगळं कौतुक.

मला आठवतं, एकदा तुला राजीव (नाईक) दादांनी विचारलं, ‘कसं सुचलं?’ तू सांगितलंस- ‘असं असं.. डोंगरावर..’ ते म्हणाले, ‘हे स्थळ झालं. कारण नाही.’

शोध सुरू. तू शोध घेतलास? काय सापडलं? तर.. हे सगळं वर मांडलंय तेच. खोदकाम अजून सुरूचय्. असंख्य प्रश्न. उत्तरं जुजबी. खोटी-खरी. सगळं फिरून कुठं येत होतं, तर या दोघा पुरुषांवर! मग नकोच हे दोघे पुरुष. एक विटेवर, आणि दुसरा चिपळ्या बडवत बसलाय. युगानुयुगे. ह्य़ांच्याकडे उत्तर असतं तर एव्हाना आलं असतं. मग दोघींनाच बोलतं करू. दोघीच बोलतील. त्या बोलल्या. हे दोन पुरुष पाहिलेत ना आजवर? आता ह्य़ांच्या पाठीशी कोण आहे त्यांची गोष्ट सांगतो. म्हणून दोघींचे प्रवेश. आधी पाठमोरे. मग प्रेक्षकाभिमुख.

मला आठवतं, आता परवा परवा तुला निरोप कळाला. तू किंचाळलास. आई घाबरली. बायको हसली. मग दोघींनीही विचारलं. दोघींना आनंदाची बातमी दिली. मग प्रयोग चालू असताना जशा होतात तशा प्रयोग चालू नसताना घरातच तुझ्या येरझारा सुरू झाल्या. घामानं डबडबताना तू सगळं सांगत राहिलास. थरथर होत होती. पुन्हा पुन्हा बातमी तपासणं होत होतं. हे जे मिळालंय, ते घडलेल्या प्रवासापेक्षा येणाऱ्या प्रवासासाठी आहे.

या प्रवासात सुरुवातीला तुला अनेक शाबासक्या मिळाल्या. पण सगळ्यात महत्त्वाचं झालं, ते म्हणजे एक धाक मिळाला. तो धाक आहे, भीती नाही. तो धाक तू वाटेवर राहण्यासाठी आहे. त्या धाकामुळं पाय जमिनीवर राहावे. चुकावं. घनघोर चुकावं. पण त्या धाकात एकाही चुकीची पुनरावृत्ती नसावी. त्या धाकावर त्याच्या खुशीने स्वार व्हायला लिहिण्याचा हुरुप यावा. लखलखित लिहिता यावं. उत्तरं मिळवायला नाही. कारण त्या दिवशी पहाटेच्या चारपासून ते आजवर.. यादरम्यान तुला एक कळालंय की.. उत्तर सापडणं महत्त्वाचं नाही.. तर दरम्यानच्या प्रवासात शहाणं होणं हे जास्त महत्त्वाचं असतं.

deshmukh.praj@gmail.com

Ref : Loksatta 

Date of Post : September 5, 2021.





No comments:

Post a Comment