Amazon

Saturday, April 16, 2022

सोयरे सहचर : वनचरांशी खेळ मी मांडून गावे

 

‘‘निसर्गाशी मैत्र जुळलं की तुम्ही कधीच एकटे नसता. जीव लावणारे असंख्य अनुभव येत राहतात. माझं लहानपण निसर्गातच गेलं. त्यामुळे वृक्षवल्लींप्रमाणेच वनचरेही सोयरे सहचर झाले. घरात असणाऱ्या गाई-गुरांपासून ते मांजरी-कुत्र्यांपर्यंत, सापांपासून फुलपाखरादी विविध कीटकांपर्यंत असंख्य जीव काहींना काही शिकवत गेले. पुढे ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’शी ओळख झाली आणि निर्सगातलं विज्ञानही कळू लागलं. निसर्गानं मला समृद्ध केलं, इतकं की ‘वनचरांशी खेळ मी मांडून गावे’ हे जगणंच झालं आहे..’’ सांगताहेत कवयित्री, लेखिका, पर्यावरण अभ्यासक रेखा शहाणे.

एकदा का तुमचं मैत्र निसर्गाशी जुळलं की तुम्ही कधीच एकटे नसता, एकाकी नसता. अनुभवलंय कधी? निसर्गाच्या एकतानतेत माझं मिसळून जाणं कधी सुरू झालं, नाही सांगता येत. आजही मनात आलं की मी एकटी, हव्याहव्याशा वाटणाऱ्या जागी, निरुद्देश भटकंतीसाठी बाहेर पडते. निसर्गातली अनेक गुपितं आपसूक नजरेला पडत राहतात..

मुलगी असण्याचं, बाई असण्याचं भय नाही वाटलं तुला? या प्रश्नाचं उत्तर नेमकं नाही सांगता येत. पण मला वाटतं, माझा या अवतालभवतालावर अधिक विश्वास आहे. त्यांचं त्यांचं एक जग असतं. तुम्ही त्यात नाही पडलात, ढवळाढवळ नाही केलीत तर ते जीवजंतू, साप, नाग कोणी नाही जात तुमच्या वाटेला. माणसांचंही तेच आहे. पण त्यांना तुमचं काय चाललंय यात नाक खुपसायचं असतं. ते चौकशी करतात. नेहमीच बरेपणाने नसेलही, पण तेव्हा समजून बोलायचं. चौकशी संपली की त्यांचा तुमच्यातला इंटरेस्ट संपतो. ते चालते होतात. मनमौजी मस्तीत चालत राहतात..

माझी एक गोष्ट बाबा सांगायचे. पाच-सहा वर्षांची असेन-नसेन तेव्हा. कुठे चाललोय ते कळण्याचं वयही नव्हतं. पण शेतामागून काही शेतं पार करत मी पोहोचले तिथे लोखंडीचं झाड फुललेलं होतं. त्या फुलांच्या सुगंधाचा माग काढत मी त्या झाडाखाली आनंदात उडय़ा मारत उभी होते. बाकी सगळे हवालदिल, पोर कुठे हरवली म्हणून. सगळीकडे ही शोधाशोध. तर, हे असलं माझं नादिष्टपण लहानपणापासूनचंच. त्या वेळी पायात बांधलेले छुमछुम आजही घुंगुरांशिवाय तसेच खुळखुळत असतात. शेणामातीनं सारवलेलं, मागेपुढे देखणी अंगणं असलेलं मातीचं मोठ्ठं जुनं घर होतं आमचं. प्रशस्त आवार, घरासमोर साडेचार एकर भातशेती. टोकाला बारमाही पाणी असलेली, रहाटगाडगं लावलेली विहीर. झापडं बांधून बैल भोवती फिरत. त्याचं मात्र मला वाईट वाटायचं. भरपूर झाडं, बांबूची बेटं, फुलं, पक्षी, कुत्री, मांजरी. साप-सापसुरळय़ा, इंगळय़ा तर कधी घरात येतील सांगता यायचं नाही. रात्री कोल्हेकुई ऐकू यायची. पलीकडच्या शेतात कधी तरस यायचा. घरात बैल, खोंड, पाच-सहा म्हशी, गाई, त्यांची वासरं होती, या सगळय़ांना ओळख होती, नावं होती. सगळं मिळून एक मोठं खटलंच ते. दूध काढण्यापासून शेणगोठा करणं, गाईगुरांना चरायला, पाणी पाजायला नेणं, शेणी घालणं, दुधाचे उकाडे घालणं, भरपूर उस्तवार असायची कामांची. ही सगळी कामं करायला बाया आणि गडीमाणसं होती. पण घरात सोवळंओवळंही भरपूर. ते साग्रसंगीत सांभाळत माणसांनी आणि कामांनी घर गजबजलेलं असायचं. त्या सगळय़ा माणसांच्या गोतावळय़ाचं, सर्वाचंच निसर्गाशी एक अतूट नातं होतं. म्हणूनच तिथल्या जैवविविधतेशी नकळत सहज ओळख होत गेली. अर्थात हे शब्दही पार नंतर माहीत झाले. पण साप, पाणसाप, नानेटय़ा कुठंही कधीही दिसायच्या. त्यांना पाहिल्यावर धावत सुटायचं नाही. त्यांच्या वाटेला जायचं नाही. आहात तिथे जसे आहात तसे उभे राहा. त्याच्या वाटेने ते निघून जातील. हा सोपा फंडा होता. पण जनावरांनी सावज पकडलेलं असेल तर ते जिवाच्या आकांतानं ओरडत असे. ‘जनावरानं बेडूक पकडलाय. आत्ता कुणी बाहेर जायचं नाही.’ आईआजीचा हाकारा व्हायचा. सावज सुटलं तर त्याचा सपाटून पाठलाग करताना जनावर कुठून कसं जाईल ते ठरवणं अवघडच. पण कोणी पोर बाहेर असेल तर गडीमाणूस पोराला हाताला धरून घरी आणून सोडत असे. त्यामुळे भयभीती तशी वाटायची नाही. हे सगळं पाहात, शिकत मी मोठी होत होते. झाडं भरपूर. त्यामुळे पक्षीही. त्यांची मधुर शीळ साद घालायची. हा कोणता पक्षी? त्यांच्या आवाजातले हलके फरक काही वेगळं सांगतात असं अंदाजानं थोडं काही समजायला लागलं. कोणत्या वेळी कोणत्या झाडावर कोण घरटं बांधतंय ते पाहायचं. चतुर, सुया, फुलपाखरांच्या मागे धावताना मजा यायची. वासरांबरोबर खेळताना- हुंदडताना गाई, म्हशी, बैल यांच्याशी आपसूक नातं जुळत गेलं. शेतातून फिरताना मनात आलं, की म्हैस-सातघरवालीचा आचळ स्वत:च्या तोंडात पिळायचा. दूध प्यायचं नि धावत सुटायचं. तिनंही कधी हुस्कावलं नाही, की लाथाडलं नाही. भुरीनं तर शिंगावरच घेतलं असतं. तिची टोकदार शिंग नंतर कापली होती तरी तिच्या जवळ जायला भीती वाटायची.

शाळा सकाळी ११ ते ५ दरम्यानची. घरापासून लांब होती. १० लाच निघायचो. डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खारटाणं होती. वाटेत बसण्यासाठी सिमेंटनं बांधलेले समोरासमोर कट्टे होते. तिथे पाण्यावर पक्षी यायचे. बाभळीवर घरटी करायचे. थंडीत वेगळे पक्षी यायचे. हुप्पू, स्वर्गीय नर्तक, फीजंट-टेल्ड जकाणा मला विलक्षण आवडायचे. शाळेच्या वाटेवर रमतगमत हे सगळं पाहणं जमून जायचं. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीची-बीएनएचएस- ओळख खूप नंतर झाली. मग बीएनएचएसबरोबर वनस्पतिशास्त्र (बॉटनी),पक्षिशास्त्र (ओर्निथोलॉजी),  कीटकशास्त्र (एण्टोमोलॉजी) यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. निसर्गाच्या जवळ जाणं अधिक सजग होत गेलं. निसर्ग निरीक्षण, संरक्षण, संवर्धनाची निकड अधिक जाणवायला लागली. मग ते वैयक्तिक, सामाजिक पातळीवर विनामोबदला जमेल तेवढं मी जरूर करते. ‘हे विश्वची माझे घर’ म्हणावं असं आमचं आवार समृद्ध होतं. पक्ष्यांचा प्याऊ होता. बुलबुल, कावळे, चिमण्या, दयाळ, कबुतरं, कधी भारद्वाज यायचे. बाकीही यायचे पण तेव्हा नावं माहीत नव्हती. त्यांचं पाणी पिणं, अंघोळी करणं पाहताना मजा यायची. पण जवळ जायचं नाही. लांबून पाहायचं, ही शिकवण. ‘प्याऊ नेहमी भरलेला हवा,’ त्यात पाण्याची भर घालत बाबा सांगायचे. माझी आजची सवय ही तेव्हापासूनची.

आपली अठरा इंच लांब शेपटी मिरवणारा देखणा ‘स्वर्गीय नर्तक’ पक्षी मन वेधून घ्यायचा. माझा भाचा सौरभ त्या वेळी लहान होता. त्यानं फोन केला, ‘‘आमच्याकडे रोज केशरी बुलबुल येतो. तू पाहिलायस का गं?’’ म्हटलं, ‘‘अरे ही मिसेस स्वर्गीय नर्तक. लहानपणापासूनची माझी मैत्रीण. आता तिचे मिस्टर येतायत का तेही पाहा.’’ माझी माहिती. राखी वटवटय़ाला तो ‘इटूकचिटूक’ म्हणायचा. बुलबुलनं केलेलं घरटं त्याला माहीत असायचं, असं सहज कुतूहल निसर्गाशी जवळीक वाढवतं.

 माझ्या लहानपणच्या आठवणींत सर्वाचा लाडका कुत्रा काळू तात्यांनी हौसेनं पाळलेला. वाण देशीच होतं. पण वाघासारखा होता. त्याची जेवायची, दूध, पाणी प्यायची भांडी, झोपायची जागा, अंथरूण,पांघरूणही होतं. जेवायच्या आधी त्याच्या खाण्यापिण्याची विचारपूस करून मगच बाबा जेवत. त्याच्या गळय़ात पट्टाही होता. पण त्याला एक खोड होती. घराजवळ टोल नाका होता. रस्ता डांबरी. पण कडेला माती होती. येणाऱ्या जाणाऱ्या एसटय़ा, गाडय़ा-बैलगाडय़ांमुळे कडेची माती अगदी मऊसूत होऊन जायची. भर दुपारी त्या मातीवर जाऊन तो लवंडायचा. त्याचा तो नेमच होता. पण एका दुपारी कुणा दुष्टानं त्याच्या अंगावर एसटी घातली. नाकेदार सांगायला आले. बाबा गहिवरले. काळू रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. काही दिवस बाबा धड जेवलेही नाहीत. पूर्वीच्या संस्कारांप्रमाणे म्हणाले, ‘आपल्या देवाला कुत्रा चालत नाही.’ पुढे आम्ही कधीही कुत्रा पाळला नाही. पण भटके कुत्रे असायचे. उरलंसुरलं अन्न फेकून न देता, युयु करून बोलवलं की ते लग्गेच हजर व्हायचे. त्यांची जागा ठरलेली होती. मग सवय लागायची आणि ते घरचेच होऊन जायचे.

 शेताभातात फिरताना ते मागे मागे, बरोबर सोबत असायचे. मधेच कधी म्युन्सिपाल्टीची भटक्या कुत्र्यांना मारायची टूम निघायची. ते अन्नातून विष घालायचे. तशा दिवसांत असाच एक न पाळलेला, पण आमच्या घरचाच झालेला कुत्रा संध्याकाळी धावत धावत जिवाच्या आकांतानं मुसंडी मारत दिंडीतून आत घुसला. नाकातोंडातून हे रक्त ओघळतंय.. मागील दारी, नेहमीच्या जागी त्यानं लोळण घेतली. धावत जाऊन आई, आज्जीला सांगितलं. त्याची तडफड बघवत नव्हती. काही न बोलता विषावर उतारा म्हणून आई आंबट ताक घेऊन आली. त्याला पाजलं. ते पिणंही त्याला जमत नव्हतं. आई त्याच्या अंगावर हात फिरवत बसली. आज्जी हळुवार झाली. त्याच्या डोक्यावर ओलं फडकं ठेवत हात फिरवत राहिली, पण उपयोग नव्हता. मेलाच तो. अन्यानं त्याला शेतात पुरलं. वेळ संध्याकाळची होती. काळोख झाला होता. बाबा घरी येण्याची वेळ होती. पाटी-पुस्तकं, दप्तरं आवरून आम्ही शिस्तीत परवचा म्हणायला बसलो. तोपर्यंत चहा घेऊन तात्या उजळणीवर लक्ष ठेवत फेऱ्या मारायचे. पण आज ते आमच्यासाठी थांबले नाहीत. अन्याबरोबर कुत्रा पुरला होता तिथे जाऊन थांबले. असे सोयरे सवंगडी आणि आम्ही एकत्रच वाढलो. त्यांच्या नसण्यानं रडलो.

अशीच आणखी एक गोष्ट आजही विसरू म्हणता विसरता येत नाही. त्या दिवशी सकाळी, नेहमीसारखी माळ ओढत तात्या अंगणात फेऱ्या मारत होते. बरोबर मीही. मोठा दिंडी दरवाजा सकाळी हलकासा उघडलेला असे. रस्ता ओलांडत एक कुत्रा आत आला. उभा राहिला. तोंडात काही होतं. आम्ही जवळ गेलो. तोंडात चिपाड झालेली आमची मांजरी होती. तिला समोर ठेवलं. बाबांकडे पाहिलं. पायाला अंग घासलं आणि दिंडी बाहेर रस्ता ओलांडून, दोन पायावर मान ठेवून बसून राहिला. त्याचं ते रूप आजही नजरेसमोरून हलत नाही. बाबा म्हणाले,‘‘आपली तारी मेली. महिना-दीड महिना तुम्ही शोधताय ना तिला. मेली ती.’’ मला रडायला आलं. कुत्र्यांजवळ जायचं नाही. त्यांना हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद असताना मी धावत बाहेर जाऊन त्या कुत्र्याच्या जवळ बसून रडत राहिले. या घरचं हे मांजर, नेमकं ओळखलं त्यानं. ते मेलंय, तर हा तिला आमच्या स्वाधीन करून मूकपणे बसून होता. शब्दांशिवायचा हा संवाद..  

आमच्या गोकुळात कधी मांजर व्यालेली असे, कधी कुत्री, गाय, कधी म्हैस किंवा एखादी कामाला येणारी गरवारशी असे.आपसूक त्या सगळय़ांकडे आई-आजी अधिक लक्ष देत. मांजरा-कुत्र्यांच्या पिलांशी, गाईम्हशींच्या वासरांशी खेळण्यात आम्ही त्यांच्यासारख्याच उत्साहात दंग असायचो. गाईची वासरं त्यांच्या अंगच्या चणीमुळे, रंगरूपामुळे मला प्रिय होती, पण सगळेच खेळगडी. आता वाटतं, बालपण म्हणजे एक सहज लोभस जीवलावी उत्सव होता.  जनावरांचे डॉक्टर अधूनमधून येत असत. तरीही वासरं मरायची. आम्हाला वाईट वाटायचं. मुंढीचं वासरू मेलं आणि ती दूध काढू देईना. चारा खाईना. नुसती ओरडत राही. शेवटी तिच्यासाठी पेंढा भरलेलं वासरू तयार केलं तेव्हा ती दूध काढू देऊ लागली, खाऊ लागली.

आमच्याकडे मांजरांच्या किती पिढय़ा जन्माला आल्या आठवतही नाही. दुधा-तुपाची रेलचेल होती. सगळी मस्त गब्दुल असायची. आमचे खेळगडीच ते. माझ्या आठवणीत जास्त तारी, गज्जू आणि उल्ल्या आहेत. माझं वाचनाचं वेड लहानपणापासूनचंच. दुसरीत असताना अकरावीची पुस्तकं वाचायचे. मी नादिष्ट आहे. आपल्याच नादात, ‘होय, झोपते आता’ म्हणत रात्ररात्र वाचत बसायचे, की गज्जू, उल्ल्या जवळ येऊनच नाही तर पुस्तकाच्या पानांवर येऊन बसायचे. मग कधी राग यायचा नि जरा चढय़ा आवाजात सांगितलं, की लाडीगोडीनं पायांशी घुटमळून मांडीवर येऊन बसायची. आणि मग झोपताना वेटोळे करून माझ्या पायांवर माझ्या बाजूलाच निजून जायची. असं मांजरांचं आणि माझं सख्य.

आवारात राखणदार म्हणजे अगदी स्वच्छ दहाचा आकडा दिसणारा कोब्राही होता. आमच्या शेतात मुंगुसंही होती. तरी साप-मुंगुसाची लढत कधी कोणाला पाहायला मिळाली नाही. पण एका विलक्षण झुंजीची मी साक्षीदार आहे. आमच्या गज्जू मांजरानं राखणदाराशी दिलेली झुंज. वेळ दुपारची. जेवण झाल्यावर बाकी सगळे गप्पा मारत पडले होते. मी आपली पक्ष्यांच्या मागे फिरत होते. स्वयंपाकघराच्या पायऱ्या चढणार तेवढय़ात पाहिलं, गज्जू उंच दगडावर कमानदार होत, शेपटी फुलवून, डावली (पंजा) मारतेय. पुन्हा जागा बदलतेय. एका आविर्भावात ती कोणाला डावल्या मारतेय कळत नव्हतं. थोडय़ा लांबवर हे चाललंय. मी तिथेच उभी होते. मग एकदम नागाचा फणा दिसला आणि हिची डावली. नागाचा फणा लाल झालेला होता. तो फुसफुसतोय. ही उंचावर पोझिशन घेऊन. मी पटकन बाबांना उठवलं. आम्ही सगळे बाहेर जमा झालो. जे चाललंय त्यात हस्तक्षेप करायचा नसतो. बाबा हाताची घडी घालून उभे होते. शेवटी गज्जूनं सापाला ठार मारलं. तेव्हाच ती  बाजूला झाली. मग तिथल्या झाडाच्या विशाल बुंध्यावर अंग चाटत शांतपणे बसली होती. नेहमीप्रमाणे अन्यानं सापाला उचलून शेतात पुरलं. सगळे हळहळले. गज्जूनं सापाला का रोखलं? का मारलं? काहीच कळलं नाही. पण एवढय़ा वर्षांचा राखणदार आमच्यासमोर गज्जूनं ठार मारून टाकला होता. काही दिवस ती बाहेरबाहेरच होती. नैवेद्याचं दूध प्यायलाही फिरकली नाही. होती आजूबाजूलाच, पण घराबाहेर. का? नाही माहीत.   

चित्रकुटीर-पेणच्या परिसराशीही माझं असंच नातं आहे. मुंबईतही काही वेगळं नाही. फुलपाखरं, पतंग तर घरात कधीही जन्माला येतात. शिवाय अनेक जखमी पक्षी, कधी घार, कावळा, तांबट असू दे, की चिमणी, कोणी का असेना, बरी होऊन उडून जातात. उन्हानं हल्लक झालेला तांबट एकदा तीनेक दिवस घरी होता. ‘एशियाटिक’मधून येताना अशोक शहाणे त्याच्यासाठी रुमालात उंबराची पिकलेली फळं बांधून घेऊन यायचे. तर कधी पोरकी झालेली पक्ष्यांची पिल्लंही घरात असतात. त्यात घरटय़ातून पडलेली चिमणीची पिल्लं अधिक. मग मी तिचं घरटं शोधून पिल्लू आत ठेवते.

अनेकदा संथ, शांत गतीत रानवाटांवरून चालताना, निळय़ा आकाशाकडे पाहताना वाटतं, हे सारं अवतालभवताल, निसर्गातले आगळे संमिश्र ताल, सगळे बेमालूम मिसळून गेलेत एकमेकांत आणि अख्खा निसर्ग गातोय, आश्चर्यकारक अशी एक मोठ्ठी गोड सिम्फनी! अवाढव्य, अतिप्रचंड आकलनापलीकडची सिम्फनी. पण यातले सूक्ष्म आवाज साध्या डोळय़ाला न दिसणाऱ्या जीवजंतूंपासून ते आताच्या महाकाय हत्तींचेही आहेत. सर्वदूर अजब सरमिसळ होऊन गेलीय सूरतालांची. ते संगीत ऐकता आलं तर ही सिम्फनी वेड लावते. निसर्गातलंच एक होऊन जाणं ज्यांना जमतं, त्यांचे वृक्षवल्लीसह सारे वनचर अगदी सगेसोयरे होऊन जातात. असे सगेसोयरे सहचर बरोबर असतील तर मग भय-भीती कशाची?

rekhashahane@gmail.com

तळटीप – लेखाचं शीर्षक कवी ना. धों. महानोर यांच्या ‘या भुईने या नभाला दान द्यावे’ या कवितेतील ‘पाखरांशी खेळ मी मांडून गावे’ या ओळीवर आधारित.

Ref: Loksatta




Saturday, April 9, 2022

सोयरे सहचर : ती आऊ होती म्हणुनी..

 


‘‘ जखमी कुत्री फक्त रात्री बाहेर पडतात म्हणून रात्री-बेरात्री त्यांच्या उपचारांसाठी रस्त्यांवर फिरणारी ती, प्राण्यांचा डॉक्टर असलेल्या मित्राकडे जाऊन सलाईन देणं, जखम साफ करणं मुद्दाम शिकून घेणारी ती, टाळेबंदीमध्ये दररोज रस्त्यावरच्या दोनशे कुत्र्यांना जेवायला घालणारी ती, जखमी गाय-वासरू, रस्त्यावरचा घोडा, कासवं, जखमी कावळे, घुबडं, वटवाघळं, मासे.. या सगळय़ांची काळजी घेणारी  त्यांची आऊ, अमूर्त चित्रकार आणि माझी बायको राजश्री करकेरा-आपटे.  कर्करोगानं गेली, पण मरणापूर्वीही एक महत्त्वाची गोष्ट तिनं मला करायला सांगितली.. तिच्यासाठी मी तीही केली.. ’’ सांगताहेत चित्रकार, लेखक, पत्रकार आशुतोष राम आपटे.

‘‘टिटन टिटन  अलेले ररले टिटन टिटन.. ’’  राजश्रीनं असंच आपलं हे बनवलेलं गाणं गायलं की आमची संयुक्ता आनंदानं नाचत नाचत येते. राजश्री म्हणजे चित्रकार राजश्री करकेरा-आपटे. माझी पत्नी. आज राजश्री हयात नाही. अलीकडेच गेली ती. पण कदाचित संयुक्तासाठी हे गाणं म्हणजे राजश्रीला, तिच्या आऊला स्वरांतून भेटणं असेल. संयुक्ता ही गोल्डन रिट्रीव्हर प्रजातीची कुत्री. आमची मानसकन्या जान्हवीची नात. 

जान्हवी तर भलतीच गोड कुत्री होती. १८ सप्टेंबर २०१६ ला पहाटे सव्वाचारला ती गेली. पण आजही आमच्या सफाळय़ातील कित्येक जण तिची आठवण काढतात. राजश्रीला लाडाची टोपणनावं ठेवायची भारी हौस होती. जान्हवीलाही ती ससा म्हणायची. ‘‘ससाजान ससाजान.आऊची ससाजान’’, असं म्हटलं की जान्हवी मटकत मटकत आऊकडे जायची. जान्हवी कायम माझ्याबरोबर मोटारसायकलवर असायची. लहान मुलासारखी पुढे बसून नॉनस्टॉप मुंबईपर्यंत यायची. तसे इथं मला शेजारचेही ओळखत नाहीत. मात्र कुत्रा मोटारसायकलवर बसून येतो ही माझी ओळख अख्ख्या पंचक्रोशीत आहे. गाडी चुकून स्पीडब्रेकर किंवा खड्डय़ातून जोरात नेली, तर ही लगेच तिचा पंजा माझ्या हातावर ठेवायची. जणू सांगायची, की ‘ए बाबा, नीट चालव जरा गाडी.’ केळवे बीचला जान्हवी माझ्याबरोबर उंटावरही बसली आहे. ‘आऊ कुठे आहे?’ विचारलं तर बरोबर राजश्रीला शोधून काढायची. माझ्याबरोबर तर नेहमीच लपंडाव खेळायची. मी दरवाजाआड, गवतात कुठेही लपायचो आणि ती मला बरोबर शोधून काढायची. मी दिसत नाही तोवर तिचा जीव कासावीस व्हायचा. ती दिसली नाही की अर्थात माझ्याही काळजाचा ठोका चुकायचाच. एकदा नेहमीप्रमाणे आम्ही मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून जंगलात फिरायला गेलो होतो. अन् तिची माझी चुकामूक झाली. मी भलत्याच वाटेनं जान्हवी जान्हवी ओरडत तिला शोधत फिरत होतो.  शोधून शोधून पुन्हा परतीच्या रस्त्यानं मागे फिरलो आणि बघतो तर ही शहाण्यासारखी मोटारसायकलजवळ येऊन थांबली होती. मी वैतागलो, तिच्यावर ओरडलो, म्हणालो, ‘‘जान्हवी काही अक्कल आहे का तुला? किती शोधत होतो मी तुला?’’ तिनं शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि हळूच माझा हात चाटला. जणू म्हणत होती, ‘‘अरे बाबा, किती रे वेंधळा तू.. आपण हरवलो तर गाडीपाशी येऊन थांबायचं नं.. कशाला इकडे तिकडे शोधत फिरायचं?’’  तिला पोहण्याचंही भारी वेड होतं. समुद्रात, ओहळावर, तळय़ात, धबधब्याखाली सगळीकडे मनसोक्त पोहली आहे ती. ती गर्भार असतानाही तिला आम्ही जवळच्या एका डोहात रोज पोहायला घेऊन जायचो. पण प्रसूतीच्या दिवशी राजश्री आणि मी तिला घेऊन जात होतो, तेव्हा मात्र मागे फिरली. माझा हात तोंडात धरला आणि पुन्हा घराकडे वळली. त्या रात्री मी त्याच खोलीत थांबलो होतो. भुवन आणि रावडी या दुसऱ्या दोन कुत्र्यांना घेऊन राजश्री बाहेरच्या हॉलमध्ये होती. आम्हाला भीती वाटली, की ते जन्मलेल्या पिल्लांना काही करतील अशी. जान्हवीचं पहिलंच बाळंतपण होतं नं, म्हणूनही काळजी घेत होतो. पण झालं उलटच. मला डुलकी लागली आणि दरवाजावर रावडीचा उं उं असा आवाज आला.. त्याला बाहेरूनही कळलं होतं की पिल्लू जन्मलं म्हणून. त्याच्या आवाजानं मी जागा झालो.  बघतो तर एक पिल्लू जन्मलं होतं. आणि जान्हवी त्याला चाटत होती. पहाटेपर्यंत जान्हवीनं नऊ पिल्लांना जन्म दिला. पुढे पुढे रावडीच त्या पिल्लांना सांभाळत असे आणि जान्हवी पिल्लांना घरी सोडून, माझ्याबरोबर भटकायला तयार असे. उत्तरा, अंतरा, अंजना, तारका, नभा, आयुध, तस्कर व निओ ही तिची पिल्लं आमच्याबरोबर होती. आमच्या नवीन घराचं नावही आम्ही ‘जान्हवीचे घर’ असंच ठेवलं आहे. माझं (‘आपटय़ाची पानं’) हे पुस्तकही जान्हवीलाच अर्पण केलंय. अर्थात पुस्तकातलं अक्षरही वाचता आलं नाही तरी तिच्या बाबाच्या मनातलं अक्षरन् अक्षर तिला वाचता येत होतं!

  खरं म्हणजे या मुक्या प्राण्यांएवढं अफाट निव्र्याज प्रेम आम्हा मनुष्यांना नाहीच करता येत. कसं आहे, की आम्हा मनुष्यांना ‘प्रायोरिटी’ नावानं खूप काही असतं. आम्हाला इतर नाती असतात, ‘कमिटमेंट’ वगैरे असतात. पण प्राण्यांना आपल्याशिवाय जग नसतं. त्यांचं जे काही असतं ते सगळं आपल्याभोवती गुंफलेलं असतं. भूक लागली की जेवायचं. झोप आली की झोपायचं आणि मरण आलं की मरायचं. बाकी आयुष्यभर फक्त प्रेम करायचं इतकी साधी फिलॉसॉफी असते त्यांची!

आता जरी कुत्र्यांबद्दल मी भरभरून बोलत असलो, तरी मुळात मी कुत्र्यांना खूप घाबरतो.  पूर्वी तर मी रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या भीतीनं रात्री उशिरा घरी परतायला घाबरायचो. रात्र रात्र रेल्वे स्टेशनवर बसून राहायचो. पहाट झाली, माणसांची वर्दळ सुरू झाली की मगच घरी जात असे. आज आता मी सफाळे स्टेशनला जातो तेव्हा ‘आटो’ ही रेल्वे अपघातात एक पाय कापला गेलेली,  तीन पायांची काळी कुत्री प्लॅटफॉर्मवर मला सोडायला येते. तिच्याबरोबर आणखीही एक-दोन कुत्री असतातच. गाडी सुटेस्तोवर ती थांबतात. माझ्यात एवढा बदल घडला तो राजश्रीमुळेच. 

 सर ज. जी. कला महाविद्यालयात आम्ही, मी आणि राजश्री दोघेही चित्रकला शिकलो. तिच्याशी माझा प्रेमविवाह झाला आणि मग तिच्या कुत्र्यामांजरांचं मंगळसूत्र माझ्या गळय़ात पडलं. मीही अग्निसाक्षीनं त्यांचा प्रेमळ बाप झालो. मुंबईत विलेपाल्र्याला. तिच्या वडिलांचं पाच गुंठे जागा असलेले बैठं घर सफाळय़ात होतं. तिथे लक्ष्मी, ऐश्वर्या, श्वेता, मंथन, भुवन आणि खतरनाक रावडी अशी सहा कुत्री होती. नुकतंच आमचं प्रेम उमलत होतं. तिला भेटायला मी सफाळय़ात आलो होतो. तिला भेटणार यापेक्षा तिच्या या सहा कुत्र्यांच्या भीतीनं माझं काळीज वरखाली होत होतं. प्रेयसीचा भाऊ पैलवान वगैरे असू शकतो हे ऐकून होतो, पण प्रेयसीचे दात दाखवून गुरगुरणारे सहा कुत्रे हे प्रकरण पचायला जडच होतं. राजश्रीनं गेटमधून मला घरात घेतलं व कुत्र्यांना ओढत वगैरे आतल्या खोलीत नेऊन ठेवायला गेली. पण नेमका तो रावडी- जो सगळय़ात खतरनाक आणि चावरा कुत्रा म्हणून प्रसिद्ध होता तो बाहेर हॉलमध्येच राहिला होता. राजश्री म्हणाली होती, भुवन खूप प्रेमळ आहे. जरा डोक्यावरून हात फिरवला की सारखा येऊन चिकटतो. मला त्या वेळी रावडी कोण भुवन कोण हे कुठे माहीत होतं? मी आपलं डेअिरग करुन प्रेमळ भुवन समजून रावडीच्याच डोक्यावरून हात फिरवत होतो. रावडीला माझं उतू जाणारं प्रेम कळलं की काय कुणास ठाऊक. त्यानं मला काहीच केलं नाही. बहुतेक हा राजश्रीसाठी तिच्या कुत्र्यांना मला ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम होता. त्यांनी मला पसंत केलं तेव्हा ती माझ्याशी लग्नाला तयार झाली.

 लग्नानंतर आम्ही मीरारोडला राहात होतो. नुकतंच लग्न झालेलं आणि राजश्री कधी कधी रात्री एक-दीड वाजता बिल्डिंग उतरून रस्त्यावरच्या जखमी कुत्र्यांवर उपचार करायला जायची. मग तिच्या काळजीपोटी तिच्याबरोबर मलाही जावं लागायचं. मी चिडायचो, तिला म्हणायचो, ‘‘दिवसा काय ते उपचार कर ना. इतक्या रात्री काय?’’ पण नंतर मला कळलं, जखम झालेले, जखमेत किडे पडलेले कुत्रे दिवसा लपून असतात. कारण वास येतो म्हणून लोक हाकलतात आणि दिवसा जखमेवर बसणाऱ्या माशाही खूप त्रास देतात. म्हणून ते बिचारे रात्री उशिराच कचराकुंडीत खाणं शोधायला बाहेर पडतात. राजश्री ही अशी मुलखावेगळी होती. पुढे आम्ही रत्नागिरीत आठ महिने खास एक बंगला भाडय़ानं घेऊन राहिलो होतो. कारण तिथे डॉ. अविनाश भागवत हा माझा जवळचा मित्र प्राण्यांचा डॉक्टर आहे. राजश्री रोज त्याच्या दवाखान्यात जाऊन, त्याच्याकडून प्राण्यांवर उपचार करायला शिकली. अगदी सलाईन देणं असो, जखम साफ करणं असो, की छोटं मोठं आजाराचं निदान असो. प्राण्यांच्या बाबतीतलं खूप सारं ती तिथे शिकली. त्याचा उपयोग तिनं रस्त्यावरच्या कुत्र्यांना बरं करण्यासाठी केला. 

राजश्री आमच्या पिढीतील नवं काही करणारी आघाडीची चित्रकार होती. अमूर्त चित्रकार म्हणून प्रसिद्धही होती. पण रस्त्यावर, गटारात कुठेही कुत्र्यांवर उपचार करताना तिनं कधी बाऊ केला नाही. मुंबईत ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ला वर्गात चित्र काढताना एक जखमी घुबड तिच्याजवळ  येऊन बसत असे. त्याच्यावर तिनं प्राण्यांच्या डॉक्टरांकडून उपचार करवून त्याला बरं केलं होतं. ‘जेजे’तली जखमा झालेली दोन मांजरंही तिनं बरी करून विलेपाल्र्याला तिच्या घरी नेली होती. तिच्या मदतीला तेव्हा तिच्या वर्गातला संजय सावंत असायचा.राजश्रीनं ही प्राणिप्रेमाची दीक्षा अनेकांना दिली होती. तिचा मोठा भाऊ कमल करकेरा यालाही राजश्रीमुळे प्राण्यांची गोडी लागली. आजुबाजूच्या भटक्या कुत्र्यांचं पोट तो भरतो. मी घरी नसेन त्या वेळी आमच्या इथल्या कुत्र्यांचं संगोपन करायला तो येतो. अन् तो असला की मीही निर्धास्त असतो. असाच आमचा मकरंद खेडेकर. राहातो मुंबईत दादरला. तिथे तो जिम ट्रेनर आहे. पण वेळ पडेल तेव्हा इथे येतो कुत्र्यांची काळजी घ्यायला. मकरंदची पत्नी वैशाली बने राजश्रीची मैत्रीण होती. ती होती मुंबईची. तिनं तर आमच्या घरापासून दहा किलोमीटरवर वेढी गावात मांजरी आणि कुत्र्यांसाठी घर बांधलं होतं. ती कर्करोगानं वारली. तशी तिची कुत्री-मांजरी आमच्या घरी आली. आज इथे पालघर जिल्ह्यातील गिराळे गावात आमच्याकडे संयुक्ता, सावरी, सुखी, गौतमी, वीरांगना, चिरकुट, चिकू, चिमणी, लेडी मायकेल, बबीता, हिडिंबा, कॅस्पर, कानफाटय़ा, गणपत, झिंगा, मोती, रायबा असे १७ जण आणि दोन बोके आहेत. यातले बरेचसे रस्त्यावरचे, किंवा काहींना अडचणीतून सोडवून, आमच्या घरी आश्रय दिलेले आहेत. सावरीला दिल्लीत एका पिंजऱ्यात कोंडून ठेवलेलं होतं म्हणून, ट्रेनच्या फस्र्ट एसी मधून राजश्री तिला घेऊन आली होती. बबिता लहानपणी कोणा गाडीच्या अपघातात एका नाल्यात तीन दिवस पडून होती. राजश्रीला कळलं तेव्हा ती तिला घेऊन आली. झिंगा कित्येक महिने झोपूनच होता. आता गोल गोल फिरत चालतो थोडाफार. गणपत रेल्वे स्टेशनवर एक पाय कापलेल्या अवस्थेत पडून होता, आता आनंदात तीन पायांवर जगतो आहे.

स्वप्निल तावडे हा मर्चंट नेव्हीतला कॅप्टन. अमेरिकन बुली प्रजातीची सुखी त्याच्याकडची.  पण तो समुद्रात असताना सांभाळणार कोण, म्हणून मोठय़ा विश्वासानं त्यानं आमच्याकडे ठेवली आहे. प्रत्येकाचं एक कथानक आहे. प्रत्येकाची एक दर्दभरी फाईल आहे. पण आता ती आमची आनंदी बाळं आहेत. आणखीही खूप जणं आली, नांदली. प्रेम दिलं आणि काळाच्या पडद्याआड गायब झाली.  ‘योध्दा’सारखा रस्त्यावर सोडून दिलेला अवाढव्य ग्रेट डेन होता. जो राजश्रीलाच दोन वेळा हातभर चावला होता. पण त्यालाही तिनं प्रेमानं सांभाळलं. जर्मन शेफर्ड वीरांगना होती. कारच्या पुढच्या खिडकीतून ती थेट उडी मारून माझ्या बाजूच्या सीटवर बसायची. हरवून सापडलेली सैरन्ध्री नावाची पग होती. जी सफाळय़ात हरवली होती आणि मुंबईत बोरिवलीला सापडली होती. आंधळी आषाढी होती. लाजरा आषाढ होता. चिडखोर रुस्तम होता. प्रेमळ दगडू( रॉकी) होता. पांढरे सॉक्स घातल्यासारखा पांढऱ्या पायांचा काळा मोजा होता. खूप कमी जगलेला आवा होता. अनेक अनामिक तात्पुरते येऊन गेले. आमच्याकडे गाय वासरूही येऊन बरे होऊन गोशाळेत गेलेत. रस्त्यावरचा घोडा टेम्पोत घालून मी आणि राजश्रीनं कर्जतच्या एका आश्रयस्थळी नेऊन दिला. कासवंही होती. जखमी कावळे होते. घुबडं होती. वटवाघूळ, मासेही होते.

खूप पूर्वी एक नाग घरात आला होता. तेव्हा प्रकाश वाघमारे आणि राजश्रीनं तक्क्याच्या कापडी आवरणात, हँडमेड पेपरचा रोल टाकून त्यात कसंबसं पकडलं. प्रकाश सायकल चालवत होता. राजश्री पाठी कॅरियरवर तो नाग घेऊन बसली होती. त्याला जंगलात सोडून आले. इथेही एक साप तिनं पाण्याच्या बादलीत पकडला आणि बाहेर सोडताना दगडाला अडकून सापासहित हीच पडली. नशीब तो साप हिच्या गळय़ात नाही पडला. डास, गोचीड सोडली तर ही कुणालाही मारू देत नसे. कोळय़ाच्या जाळय़ात अडकलेली फुलपाखरंही ही मला सोडवायला लावायची. टाळेबंदीमध्ये चायनीज गाडय़ा आणि हॉटेल्स बंद होती. मग रस्त्यावरचे कुत्रे काय खाणार, म्हणून ही दररोज रात्री गाडीत मोठमोठी पातेली घेऊन २०० कुत्र्यांना वाढायला जायची. 

कर्करोगामुळे २९ डिसेंबर २०२१ ला दवाखान्यात स्वत: गंभीर अवस्थेत असताना रात्री एक वाजून ४० मिनिटांनी तिनं मला सांगितलं, ‘‘आशु, मी मरणार आहे. पण आता मी आहे तोवर मी मेल्यावर काय करायचं ते माझ्याशी बोल.’’ मी विचारलं, ‘‘कुत्र्यांची काळजी वाटते का?’’ तर ती म्हणाली, ‘‘नाही तू सांभाळशील त्यांना. पण मी मेल्यावर माझं प्रेत त्या सगळय़ांना बघू दे. म्हणजे वाट नाही बघणार ते माझी कधी. त्यांना कळेल आपली आऊ गेली म्हणून. आणि माझं देहदान नाही झालं तर लाकडांवर जाळू नकोस मला. इलेक्ट्रिक किंवा गॅसवर चालणाऱ्या स्मशानातच जाळ. दहावं-बारावं काही करू नका माझं. पैसे खर्चच करायचे तर सफाळय़ातल्या रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी काही करा. ’’

माझा होकार ऐकताच त्या दिवशी लहान मुलाचं निरागस हसू ओठांवर ओसंडत शांत झोपली ती. पाच जानेवारीला रात्री गेली ती. तिचा मृतदेह मुंबईहून गिराळेला आणला. तिच्या बाळांना वासानंच कळलं असणार, त्यांची आऊ गेली म्हणून. हिडिंबा पहाटभर तिच्या बाजूला बसून होती. सुदैवाने नायर रुग्णालयानं कर्करोग असूनही तिचं देहदान स्वीकारलं. तिची अंतिम इच्छा पूर्ण झाली.  अमूर्त चित्रकार होती ती. शरीराच्या मूर्त कुडीतून अमूर्त झाली. दोन पायांच्या देहातून निघून खूपशा चार पायांच्या हृदयात विसावली. पण आजही, अगदी आत्ताही दिसते ती. कुत्र्यांच्या निरागस डोळय़ातून लुकलुकत. शेवटी तिची ही चार पायांची बाळं हाच तर आता माझ्या जगण्याचा आधार आहे.

ashuaptejj@yahoo.com

Ref: Loksatta



जंगलातला चैत्रसोहळा


डॉ. विनया जंगले.


‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलंच नाही; झाडांची पोपटी पालवी..मला अधिक विश्वासार्ह वाटली – द. भा. धामणस्कर


प्रत्येक ऋतूत जंगलाचं एक वेगळं रूप असतं. परंतु चैत्रातील जंगल हे रंग, गंध आणि चैतन्याचा साज लेवून येतं. एरवी रूक्ष वाटणारं पांगाऱ्याचं काटेरी झाड पक्ष्याच्या चोचीसारख्या आकाराच्या शेंदरी रंगाच्या फुलांनी चैत्रात बहरून येतं. रंगांच्या या उत्सवात पिवळी फुलंही दिमाखात दाखल होतात. लिंबकांतीच्या बहाव्याचे झुंबर भरदुपारी कडक उन्हात डोळ्यांना थंडावा देतात. या पिवळ्या बहाव्याबरोबरच क्वचित कधीतरी गुलाबी बहावाही नजरेस पडतो..
आंब्याच्या झाडावर फाल्गुनात बहरलेला मोहर जाऊन कैऱ्या दिसू लागल्या, पिंपळाच्या झाडावर लालसर पोपटी पालवीचा साज चढला आणि प्रेमाने वेडा होऊन तप्त दुपारी कोकीळ कोकिळेला साद घालू लागला की लगेचच मन ओळखतं.. चैत्र आला!
प्रत्येक ऋतूत जंगलाचं एक वेगळं रूप असतं. परंतु चैत्रातील जंगल हे रंग, गंध आणि चैतन्याचा साज लेवून येतं. एरवी रूक्ष वाटणारं पांगाऱ्याचं काटेरी झाड पक्ष्याच्या चोचीसारख्या आकाराच्या शेंदरी रंगाच्या फुलांनी चैत्रात बहरून येतं. अंजनीचं छोटंसं झुडूप गडद जांभळ्या फुलांनी भरून जातं. अंजनीच्या फुलांच्या कडेलाच गुलाबी रंगाच्या मण्यासारख्या कळ्या फुलण्याच्या जणू प्रतीक्षेत रांगेत उभ्या असतात. अंजनीच्या झाडावरील फुलं आणि कळ्यांचा जांभळ्या गुलाबी रंगांचा संगम भरजरी रंगाच्या नीलमण्याप्रमाणे चमकत असतो. शेवरीच्या काटेरी झाडावर फाल्गुनात फुललेली गुलाबी लाल रंगाची फुलं गळून जाऊन शेंगा यायला सुरुवात होते. आता फुलण्याची पाळी कौशीची असते. कौशीचं उंचच उंच झाड झिरमिळ्यासारखी दिसणारी केशरी फुलं माळून चैत्राचा भगवा झेंडा फडकवत राहतं. कौशीची फुलं फुलली की या झाडांवर पक्ष्यांची लगबग सुरू होते. साळुंखी, चमकदार रंगाचे जांभळे सूर्यपक्षी, मुनिया या अशा अनेक पक्ष्यांची चिवचिव या झाडांवर सुरू असते. पक्ष्यांबरोबरच खारुताई चिक्चिक् आवाज करत कौशीच्या फुलांकडे झेपावताना पाहावयास मिळते. कौशीच्या भगव्या रंगात रंगून जावं तर पलीकडच्या डेरेदार वडाला लालचुटुक फळं आलेली असतात. टक्टक् आवाज करणाऱ्या हिरव्या रंगाच्या लाल मानेच्या तांबट पक्ष्यांची पंगत या झाडावर बसून फळांचा फडशा पाडत असते. रंगीत फुलं, फळं नाहीत म्हणून कुसुमाचं झाड अजिबात रुसून बसत नाही. ते आपल्या लाल- गुलाबी पालवीचा बहर अख्ख्या चैत्रात मिरवत राहतं. कुसुम फुलांच्या रंगाची पानं मिरवतं, तर उक्शीची वेल पानाच्या हिरव्या रंगाच्या असंख्य फुलांनी बहरून येते. उक्शीची फुलं कोमेजताना तपकिरी रंगाची होतात आणि वाऱ्याबरोबर भिरभिरत खाली पडत राहतात. फाल्गुनात फुललेल्या गुलाबी रंगाच्या ग्लिरीसिडीया किंवा उंदीरमारीचा बहर आता उतरणीला लागतो. परंतु गुलाबी रंगाची कमतरता भरून काढण्यासाठी जणू रेन-ट्री पावडर पफसारखी दिसणारी गुलाबी फुलं डोईवर लेवून अवतरतो. रस्त्याच्या बाजूला जागोजागी सावलीसाठी लावलेला हा परदेशी वृक्ष आज देशी वृक्षांच्या बरोबरीने चैत्रात मिरवत असतो.
लाल कुंकवाच्या बाजूला ठेवलेल्या हळदीप्रमाणे या रंगांच्या उत्सवात पिवळी फुलं दिमाखात दाखल होतात. लिंबकांतीच्या बहाव्याचे झुंबर भरदुपारी कडक उन्हात डोळ्यांना थंडावा देतात. या पिवळ्या बहाव्याबरोबरच क्वचित कधीतरी गुलाबी बहावा नजरेस पडतो. पिवळ्याधमक रंगाचा सोनमोहर फुलांची छत्री उघडून सावलीत विसावण्याचं जणू आमंत्रण देत असतो. पानांच्या हिरव्या आणि फुलांच्या पिवळ्या तुऱ्यांची नक्षी बहाव्याच्या शिरावर पसरलेली असते. मुंबईतील आरे कॉलनीत जागोजागी हे सोनमोहर नजरेस पडतात. सरत्या दुपारी सोनमोहराच्या पिवळ्या पाकळ्यांच्या गालिचावर बसून चैत्रातील जंगल न्याहाळण्याचं सुख काही औरच म्हणावं लागेल. गडद पिवळ्या रंगाचा बहावा आणि सोनमोहरासारख्या फुलांमध्ये फिकट पिवळ्या रंगाचा कुंभ काहीसा दुर्लक्षित राहतो. चैत्रापासून कुंभ फुलू लागतो. कुंभ म्हणजे पश्चिम घाटातील एक वैशिष्टय़पूर्ण वृक्ष. फाल्गुनात संपूर्ण निष्पर्ण झालेला हा वृक्ष चैत्रात केवळ फुलांनी बहरून येतो. नऊ-दहा से.मी. व्यासाचं फूल.. त्यात पिवळट रंगांच्या पाकळ्या आणि मध्यभागी पांढऱ्या रंगाचे धाग्यासारखे असंख्य मुलायम पुंकेसर कुंभाच्या झाडाचं सौंदर्य खुलवत असतात. कुंभाच्या फळांचा आकार मडक्यासारखा असतो, म्हणूनच याचं नाव ‘कुंभ’ पडलं असावं. पिवळ्या बहराचा विषय निघाल्यावर शिवणवृक्षाला विसरून कसं चालेल? मजबूत खोडाच्या या उंचच उंच वृक्षाच्या पानांचा आकार पत्त्यातील बदामासारखा असतो. चैत्रात जंगलातून फिरताना पायतळी पिवळी फुलं दृष्टीस पडतात. आपसूक नजर बाजूला फिरते तेव्हा काळसर रंगाचं शिवणाचं मजबूत खोड दृष्टीस पडतं. याच्या फुलांचा आकारही वेगळाच. चार पाकळ्या एका बाजूला आणि पाचवी पाकळी या उरलेल्या पाकळ्यांवर फणा उभारल्यासारखी दुसऱ्या बाजूला दिसत राहते. परसदारात लावलेल्या पपयांवरील फळं चैत्राचं ऊन लागलं की पिवळीधम्मक होऊन जातात. त्यांच्या गोड वासाने मोहित होऊन आलेली कोकिळा पिवळ्याधम्मक पपयांवर टोचा मारताना दिसत राहते.
रंगांच्या या उत्सवात गंधांचं लेणं लेवून काही फुलं चैत्रात फुललेली असतात. चकचकित हिरव्या पानांचं करवंदाचं काटेरी झुडूप आपल्या चांदण्यासारख्या पांढऱ्या फुलातून गंधाचं लेणं आसमंताला देत असतं. चैत्राच्या शेवटी शेवटी या फुलातून हिरवी मण्यासारखी करवंदं डोकावू लागतात. करवंदाप्रमाणे आणखी एक फूल आपल्या गंधाने आसमंत धुंद करत असतं. ते म्हणजे कुडय़ाचं. करवंदाच्या फुलाचा रंग कापसासारखा पांढराशुभ्र, तर कुडय़ाचा पिवळट पांढरा. कुडय़ाचं झुडूप करवंदापेक्षा मोठय़ा आकाराचं. कोकणात कुडय़ाच्या फुलांची भाजी चैत्रात हमखास खाल्ली जाते. कुडय़ाच्या फुलांनी ईस्टरच्या रविवारी चर्चची सजावट होते, तर देवळाच्या बाजूला असलेला चाफा चैत्रात देवळाच्या अंगणात मंद सुगंधाची बरसात करत राहतो.
वनस्पतीमध्ये ज्याप्रमाणे रंग-गंधांची मैफल जमलेली असते, त्याचप्रमाणे कित्येक पक्ष्यांचाही हा विणीचा हंगाम असतो. कावळे, चिमण्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू असते. पिवळ्याधम्मक रंगाचा हळद्या ऐन दुपारी आंब्याच्या झाडावर बसून प्रियतमेला साद घालत राहतो. चमकदार तपकिरी रंगाचे पंख असलेल्या पाकोळ्या आपल्या चोचीतून चिखल आणून मातीचं घरटं बांधत राहतात. सरत्या चैत्रात कोकिळा कावळ्यांच्या घरटय़ात अंडी घालण्यासाठी धडपडू लागतात. जंगलातील हरिणी आपली फाल्गुनात जन्माला आलेली पाडसं सोबत घेऊन कोवळ्या पालवीवर ताव मारत असतात. माकडीणी आपली नवजात पिल्लं घट्ट पकडून पिंपळाच्या झाडावर दुपारी विश्रांती घेत असतात.
हळूहळू निसर्गाचं रूप पालटतं. ताम्हणीचे निळे-जांभळे तुरे सरत्या चैत्रात वाऱ्यावर डोलू लागतात. ऊन तापू लागतं. प्राणी पाण्याच्या शोधात फिरू लागतात. बहराचा चैत्र संपून तप्त वैशाखाची चाहूल लागते..

vetvinaya@gmail.com

Ref : loksatta