Amazon

Saturday, September 18, 2021

मन आनंद आनंद छायो..

 

मन आनंद आनंद छायो!

प्राची मोकाशी

‘मन आनंद आनंद छायो..’

सकाळी सकाळी सानिका इलेक्ट्रॉनिक तंबोरा लावून गाण्याचा रियाज करत होती. एवढय़ात आईने तिला थांबवलं.

‘हे काय?’ आईने थोडंसं रागावून तिला विचारलं.

‘काय झालं?’

‘अहीर-भैरव रागातलं गाणं आहे नं? मग ऋषभ कोमल हवाय!’ आईने गाण्याचे स्वर गाऊन दाखवले.

‘अरे हो! चुकलं, चुकलं. पुन्हा गाते..’

‘सानिका, काय झालंय? मी कालपासून पाहतेय.. तुझं रियाजामध्ये मनच नाहीये. अगदी उपरं गातेयस्.’ आईने तंबोऱ्याचं बटण बंद केलं. सानिका तिच्या आईकडूनच गाणं शिकायची.

‘जाम कंटाळा आलाय! राग राग होतोय सगळ्याचा!’

‘पण या रागामुळे राग चुकतोय आपला! आणि तूच म्हणतेस नं, की गाणं तुझं ‘टॉनिक’ आहे!’

‘आहेच! पण गेले काही दिवस टॉनिक काम करत नाहीये. बहुधा अंगात शिरलेल्या या कंटाळ्याला ‘इम्यून’ झालंय.’

‘काय झालंय असं?’

‘कुठे जायचं-यायचं नाही. सतत या करोनाची भीती. ताईची बारावीची परीक्षा होतेय की नाही, याचं सगळ्यांना टेन्शन. बाबांना रोज बँंकेत नोकरीला जावं लागतंय, त्यांची काळजी. माझ्या ‘ऑनलाइन’ शाळेचे निरनिराळे प्रॉब्लेम्स. तुझे गाण्याचे ‘ऑनलाइन’ क्लास सुरू असताना पन्नास वेळा बंद पडणारं नेटवर्क.. मग तुझी होणारी अस्वस्थता.. वर्षभर हेच सगळं चाललंय. काही वेगळं रुटीनच नाहीये. त्यावर ‘व्हॅक्सिन हाच तोडगा!’ म्हणता म्हणता आणखीनच नवं टेन्शन झालंय. आजी-आजोबांचा व्हॅक्सिनचा पहिला डोस झालाय, तर दुसरा डोस घेण्यासाठी व्हॅक्सिनच उपलब्ध नाहीये. किती ही अनिश्चितता!’

‘कळतंय मला.’

‘खाली साधं सायकलने दोन राउंड फिरून यायचं म्हटलं तरी जाता येत नाही, कारण आपली गल्ली सध्या मायक्रो-कन्टेनमेंट झोनमध्ये आहे. या मास्कमुळे आधीच बंदिस्त वाटतंय. त्यात आता हा करोना ‘एअर-बोर्न’ का काय ते सिद्ध झाल्यापासून डबल मास्क घाला म्हणे. गुदमरायला होतंय! असंही.. आणि या बेक्कार रुटीनमुळेही. ‘हर्ड-इम्युनिटी, बायो-बबल, असिम्प्टमॅटिक कॅरिअर्स, कोमोर्बिडिटी, क्वारंटाइन, आयसोलेशन..’ सध्या नुसता शब्दकोशच वाढत चाललाय! कधी संपणार हे दुष्टचक्र?’

‘आज खूप ‘निगेटिव्ह’ झालीयेस!’

‘तर काय! रंजूताईचा फोन आल्यापासून तर अजूनच वैताग आलाय. वर्षभर मानेवर खडा ठेवून अभ्यास केलाय बिचारीने. आणि एकदम परीक्षाच रद्द? आपल्या देशात इतर सगळं व्यवस्थित सुरू असतं. गदा येते ती नेहमी फक्त शिक्षणावरच! पुढच्या वर्षी मी दहावीत जाईन. तोपर्यंत तरी गेलेला असेल का हा करोना?’

रंजूताई सानिकाची चुलत बहीण. ती यंदा दहावीच्या परीक्षेला बसणार होती.

‘सानू, प्रॉब्लेम्स आहेत.. तुझी चिडचिड होतेय. कदाचित तुम्हाला समजून घेताना आमचंही चुकतंय. पण प्रॉब्लेम्स डोंगराएवढे मोठे करण्यापेक्षा त्यांच्यावर मात करणं, एवढंच आपल्या हातात आहे. काल रंजूताई आणि काकू खूप वैतागून बोलत होत्या.. मान्य! पण समस्या प्रत्येकाकडेच असतात. आज कुणाच्या घरी करोनाचे पेशंट आहेत, कुणाकडे या वर्षभरात काही विपरीत घडलंय. ते किती खचले असतील? पण तेही जुळवूनच घेताहेत ना परिस्थितीशी? इतरांनी निदान सामंजस्य दाखवावं.. थोडं धैर्य दाखवावं. काही काळ आपल्याला संयम दाखवावा लागणार आहे. दुसरा काही पर्याय दिसतोय का?’

‘असं किती दिवस? मन प्रसन्न ठेवा, आनंदी राहा, व्यासंग करा, मानसोपचारतज्ज्ञांचे सल्ले घ्या.. सगळे शिकवण्याच्या मूडमध्येच आहेत गेले वर्षभर.’

‘सध्याच्या दिवसांमध्ये ‘सर सलामत तो पगडी पचास’ हेच मनामध्ये घोकायचं. या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारा माणूस खरा! हा बघ, एक व्हिडीओ आलाय माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर..’

सानिकाजवळ मोबाइल देत आई तिच्या ‘ऑनलाइन’ क्लासची तयारी करायला दुसऱ्या खोलीत गेली.

सानिकाने तो अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ सुरू केला. ‘करोना.. एक मानसिक युद्ध’ असा त्या व्हिडीओचा मथळा होता. व्हिडीओत एक निवेदक चित्रांबरोबर गोष्ट सांगत होता.

सुरुवातीला दाखवली होती कारागृहातली एक कोठडी.. ज्यात सूर्यप्रकाशाचा लवलेशही नव्हता. त्या कोठडीत होते इंग्रजांनी बंदिस्त केलेले आचार्य विनोबा भावे!

‘या बंदिस्त अवस्थेत आचार्य खचतील असा इंग्रजांचा समज. पण आचार्यानी दिवसाच्या २४ तासांचं नेटकं नियोजन केलं..’ निवेदक सांगत होता.

व्हिडीओमध्ये त्या लहानशा खोलीत आचार्य चालताना, ध्यानधारणा करताना, वाचन करताना दिसले. तुरुंगात मिळालेलं कच्चं-भरडं अन्न समाधानाने खात होते. शांत झोपत होते. कालांतराने अन्न आणून देणारे पहारेकरी आणि कारागृहातील इतर पहारेकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन आचार्य त्यांना त्यावर योग्य तो सल्ला देऊ लागले. पुढे त्या कारागृहातच कैद्यांसाठी आचार्यानी गीता प्रवचनाचे वर्ग सुरू केले.

‘अशा प्रकारे आचार्यानी त्यांचा वेळ सत्कारणी आणि सत्कर्मी लावला. मित्रांनो, आज संपूर्ण जग करोना व्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी आपल्याला हवंय ‘पॉझिटिव्हिटी’ आणि संयम असलेलं आचार्यासारखं एक कणखर मन.. पुढचा काही काळ तरी. इतकं अवघड आहे का हे?’ अशा तऱ्हेची निवेदकाची व्हिडीओला समांतर अशी कॉमेंट्री सुरू होती.

शेवटी, ‘जेव्हा मन शांत असतं तेव्हाच नवे विचार सुचतात..’ अशा आशयाच्या आचार्याच्या एका सुविचाराने तो दोन मिनिटांचा व्हिडीओ संपला. मात्र, सानिकाच्या मनात असंख्य विचार सुरू होतात..

कसं ठेवलं असेल अशा परिस्थितीत आचार्यानी त्यांचं मन पॉझिटिव्ह? काही गुन्हा केला म्हणून ते तुरुंगात गेले होते का? तर नाही! स्वातंत्र्याच्या लढय़ात देशासाठी तुरुंगवास भोगत होते. म्हणजे स्वत:चा कुठलाच स्वार्थ नाही. तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे, नक्कीच! पण सारांश हाच, की खचून चालणार नाही. आचार्य त्या कारागृहात एकटे होते. इथे निदान आपण आपल्याच घरी आहोत. स्वत:साठीच घरी आहोत. घरच्यांबरोबर आहोत. मनात आलं की फोन केला आणि मित्र-मैत्रिणींशी, नातेवाईकांशी बोलतो आहोत. टीव्हीचं बटण चालू केलं की हवं ते पाहतो आहोत. कपाटात भरपूर पुस्तकं आहेत- जी अजूनही सगळी वाचली गेलेली नाहीयेत. पर्याय अगणित आहेत; पण तरीही आपल्याला कंटाळा येतोय! आचार्याकडून एक टक्का जरी आपण सगळे शिकलो नं, तर ‘कंटाळा’ हा शब्द आपल्या मनाच्या शब्दकोशातून कायमचा टाळता येईल..

सानिका तडक उठली. तिने तंबोऱ्याचं बटण ऑन केलं.

‘मन आनंद आनंद छायो

मिटय़ो गगन घन अंधकार

अखियन में जब सूरज.. आयो.. आयो.. आयो..’

ती गाऊ लागली. यावेळी तिचे सगळे स्वर ‘परफेक्ट’ लागले होते..

mokashiprachi@gmail.com

Ref : Loksatta 

Date of Post : June 20, 2021



No comments:

Post a Comment