Amazon

Sunday, September 19, 2021

‘टू इडियट्स’!

आम्ही दोघं घरीच वेगळ्या खोल्यांत ‘क्वारंटाइन’मध्ये होतो आणि आई हॉस्पिटलमध्ये आयसीयूत दाखल.



प्रभाकर बोकील pbbokil@rediffmail.com

पहिल्या टाळेबंदीनंतर सात-आठ महिन्यांनी ‘अक्षरविश्व’ वाचनालय सुरू झाल्यावर विश्वासरावांना भेटायला गेलो. ‘राव’ हे त्यांचं आडनाव. नावाला सहज जोडलं गेलं, म्हणून आदरार्थी ‘विश्वासराव’! वाचनाचं अफाट वेड असणारा हा माणूस पस्तीस वर्षांच्या बँकेतल्या नोकरीतून निवृत्त होत, आकडय़ांच्या विश्वातून ‘अक्षरविश्वात’त शिरला आणि मनापासून रमला.

रस्त्यापासून आतल्या बाजूच्या जेमतेम दोनशे-अडीचशे फुटांच्या जागेत आठ-दहा हजार पुस्तकांचा संग्रह. त्यात सातत्यानं नव्या पुस्तकांची पडणारी भर. वाचनालयात इतर कुणी नसताना, सतत कुठल्या ना कुठल्या पुस्तकात डोकं खुपसून बसलेली विश्वासरावांची मूर्ती दिसायची. ‘ सामायिक वेडा’मुळे त्यांचा माझा ‘अहो-जाहो’चा परिचय. मैत्री म्हणता येणार नाही, पण आस्था भरपूर. त्या दिवशी त्यांना पाहिल्यावर ते हडकल्यासारखे वाटले. दरवाजातच त्यांनी मुखपट्टीआडून हसत स्वागत केलं. ‘‘या, या.. पुनश्च हरी ओम! आधी ‘तीर्थ’ घेऊन हात स्टेरीलाइज करा.’’

‘‘तीर्थ चालेल, ‘कोविड’चा ‘प्रसाद’ नको. तुमच्या तब्येतीला काय झालं?’’

‘‘कोविडप्रसाद! दुसरं काय? घरचे आम्ही तिघंही. आम्ही दोघं आणि शहाऐंशी वर्षांची आई कोविड पॉझिटिव्ह निघालो. आम्ही दोघं घरीच वेगळ्या खोल्यांत ‘क्वारंटाइन’मध्ये होतो आणि आई हॉस्पिटलमध्ये आयसीयूत दाखल.’’

बोलताना अजून दोघं-तिघं वाचक पुस्तक बदलण्यासाठी आत शिरले तेव्हा ते बोलायचे थांबले. म्हणाले, ‘‘वेळ आहे ना? भरपूर गप्पा राहिल्यात. पलीकडचा ‘चहा-कट्टा’ सुरू झालाय. बसा तिकडेच. ग्रंथालय बंद करून आलोच.’’

‘चहा-कट्टा’ म्हणजे साबळेचं चहा-नाश्त्याचं टपरीवजा दुकान. आजूबाजूला कट्टय़ावर बसायला झाडाच्या सावलीतली प्रशस्त जागा. पूर्वी भरपूर गर्दी असायची. आता तुरळक तिघं-चौघंच. वर्षभरापूर्वी असेच इथं चहाबरोबर गप्पा मारताना विश्वासराव सहज म्हणाले होते, ‘‘सध्या घरी लेक आलीय. त्यामुळे वेळ छान जातो!’’

‘‘आलीय म्हणजे? कुठे  असते?’’

‘‘कुठेही असते! तशी वध्र्यापासून साठेक किलोमीटर्सवर एका शाळेत शिकवते.’’

‘‘अरे वा!.. लेकीनं तुमचं क्षेत्र नाही  निवडलं?’’

‘‘निवडलं होतं ना! भाषांची प्रचंड आवड म्हणून तिला आर्ट्सला जायचं होतं. माझ्या अट्टहासामुळे कॉमर्सला गेली. ‘बी.कॉम.’ झाली, पहिल्याच प्रयत्नात ‘सी.ए.’ झाली. वर्षभरानं चांगली नोकरी सोडताना म्हणाली, ‘बाबा, मी हे सगळं काय करतेय काही कळत नाही. कुठली एन्ट्री कुठे तरी टाकायची, क्लायंटचा फायदा-तोटा, कर वाचवण्यासाठी सगळी खरी-खोटी आकडेमोड. हे सारं कुणासाठी करतेय? याचा समाजाला काय उपयोग? मला यात काहीच इंटरेस्ट वाटत नाही. मी नोकरी सोडतेय. तुमच्या इच्छेप्रमाणे शिकले, आता जे करीन ते माझ्यासाठी.’ बस्स. अगदी स्वच्छ. आता करणार काय? या प्रश्नावर शिक्षण क्षेत्रात शिरायचंय म्हणाली.’’

‘‘अरे वा! पण एकदम इतक्या दूर?’’

‘‘एका सामाजिक संस्थेनं बऱ्याचशा दूरवरच्या खेडेगावांतून शाळा चालवायला घेतल्या आहेत. अशाच एका वर्ध्या जवळच्या शाळेत अनुभव घ्यावा म्हणून जायला लागली. शाळेत व्यावहारिक विषय सगळे शिकवतात, पण अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन इतर ज्ञान भरपूर द्यायचं, अशी जगावेगळी शाळा. वर्गातल्या शिक्षणाबरोबर वर्गाबाहेरचं निसर्गशिक्षण जास्त. नद्या, पर्वत, वृक्ष-वल्ली, पक्षी-प्राणी, ग्रह-तारे.. अगदी भोवतालचा कुठलाही विषय. एकदा मुलांना सांगितलं, की घरून आई-वडिलांना न विचारता कुठल्याही विषयावर निबंध लिहून आणा. तर साठ टक्के  निबंधांमधून ‘शाळेला रविवारचीदेखील सुट्टी नको’ असा विचार मांडणारी यांच्या शाळेतली मुलं. त्यांच्या शाळेत आता एकदेखील ‘ड्रॉपआऊट’ नसतो. थोडक्यात, रमली तिथेच. पगार दहा हजार रुपये! म्हणाली, ‘काय करायचाय जास्त पगार? मला किती लागतं?’ ती खरोखरच अतिशय साधेपणानं राहाते तिकडे. त्यामुळे वायफळ खर्च  नाही.’’

‘‘छान, पण एकटीच राहते? लग्न-बिग्न?’’

‘‘ती तर गंमतच आहे. आम्हाला वाटायचं, आता हिच्याशी कोण लग्न करणार? पण तिला तिथं शाळेतच एक मूळचा नागपूरचा, सॉफ्टवेअर इंजिनीअर असूनही शिक्षण क्षेत्रात काम करणारा मुलगा भेटला. दोघांनी बरोबरीनं ‘बी.एड.’ केलं. दोन वर्षांपूर्वी नागपूरलाच अतिशय साध्या पद्धतीनं लग्न झालं. मुलगी इंग्रजीसह सर्व भाषा, गणित शिकवते. तो शास्त्र-विज्ञान-कॉम्प्युटर शिकवतो. शिवाय शाळेव्यतिरिक्त सगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी शैक्षणिक ‘डिजिटल अ‍ॅप्स’ बनवण्यात गढलेला असतो. ही व्यवस्थित, टापटिपीची. तो अस्ताव्यस्त, गबाळ्या! पण दोघांचा ध्यास एकच. त्यामुळे दोघांचं छान चाललंय. संसार वाढवण्याचा सध्या तरी विचार नाही. तिकडच्या दोन शाळा त्यांच्या संस्थेनं जणू यांना दत्तकच दिल्यात. इतर होतकरू शिक्षकांच्या मदतीनं चांगली चालवतात शाळा. संस्थेतर्फे भारतभर इतर शाळांतून मार्गदर्शन करण्यासाठी सेकंड क्लासनं, मिळेल त्या सार्वजनिक वाहनानं दोघं भटकत असतात. नेपाळ, इंडोनेशिया, वगैरेंसारख्या मागास देशातल्या शाळांना तिकडे जाऊन दोघं ‘कन्सल्टन्सी’देखील देतात. दोघं आनंदात असतात. माझ्या मुलीचं नाव विद्या अन् जावयाचं विनय. मी गमतीनं म्हणतो, ‘विद्या विनयेन शोभते!’ तिच्या मनाचा मार्ग तिनं शोधला. तिच्या आवडीचा, छंदाचा तिनं व्यवसाय केला. त्या बाबतीत मी मानतो तिला. आम्ही चौकटीतले. निवृत्तीनंतर जमलं तर आवड, छंद जोपासणारे!’’

त्या दिवशी निघताना थोडं थांबून हसत म्हणाले, ‘‘नोकरीत असताना समाजातल्या सर्व थरांतली माणसं भेटली. त्यांच्याविषयी हल्ली जमेल तसं लिहीत असतो. तेव्हा जाणवतं, माणूस कळणं फार कठीण! कधी कधी स्वत:कडे त्रयस्थासारखं पाहाताना मलाच मी त्या ‘थ्री इडियटस्’मधल्या मुलाच्या मनाविरुद्ध शिक्षणाची जबरदस्ती करणाऱ्या बापासारखा- परीक्षित सहानीसारखा हेकेखोर वाटायला लागतो!’’

विश्वासरावांची वाट पाहाताना हे सर्व आठवत होतो. मनात विचार आला, ‘‘कोविडमुळे हे दोघं नवरा-बायको घरी वेगळ्या खोल्यांत ‘क्वारंटाइन’मध्ये. आई थेट हॉस्पिटलमध्ये आयसीयूत अ‍ॅडमिट. मुलगी-जावई लांब वर्ध्यापलीकडे. कसं जमलं असेल? विश्वासरावांना विद्या ही एकुलती एक मुलगी, की अजून कुणी? विश्वासराव समोर येऊन बसल्यावर मी मनातला प्रश्न विचारलाच.

‘‘विद्या एकुलती एकच. सुदैवानं तेव्हा ती इथंच आली होती संस्थेच्या कामासाठी. इथंच राहून आमच्या आजारपणात तिनं अतोनात कष्ट घेतले. रोजच्या लागणाऱ्या भाजीपाला-वाणसामानाची खरेदी, जेवणखाण, आमचं दोघांचं करून हॉस्पिटलमध्ये धावपळ करत जायची. आजीला भेटता यायचं नाही, तरी बाहेर बसून राहायची. काही हवं-नको, आर्थिक व्यवहार बघायची.’’

‘‘आई बऱ्या आहेत ना? त्या कधी घरी आल्या?’’

‘‘अ‍ॅडमिट झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिला व्हेंटिलेटर लागला, तिसऱ्या दिवशी कोमात गेली.. अन् चौथ्या दिवशी कायमची गेलीच. न भेटता.. हॉस्पिटलमध्ये.. बेवारशासारखी!’’ विश्वासराव दूर शून्यात बघत राहिले. मग सावरत म्हणाले, ‘‘आम्ही दोघं घरी ‘क्वारंटाइन’मध्ये बेडय़ा घातल्यासारखे. आईचं अखेरचं दर्शन तरी कसं व्हावं? अशक्यच. कोविड नियमाप्रमाणे हॉस्पिटलमधनं ‘बॉडी’ पूर्ण पॅक करून परस्पर स्मशानात नेणार. ‘पॅक’ करण्यापूर्वी विद्याला लांबूनच क्षणभर दर्शन झालं, तेवढंच.’’

‘‘बाप रे.. सगळंच कठीण. आपल्याच रक्ताच्या माणसांशी अशी  ताटातूट..’’

‘‘विद्याचा तर अतोनात जीव आजीवर. आमची दोघांची नोकरी. तिच्यासाठी आम्ही नव्हतोच दिवसभर. तिच्याकडे लहानपणापासून बघणारी तिची आजीच होती. आजी रूढी-परंपरा पाळणारी, नात दुसऱ्या टोकाची. तरी दोघींचं छान जमायचं. आजी गेली त्या क्षणी ती मनातून पार खचली होती, पण त्यातूनही तिनं वेगळा विचार केला. स्मशानाचा मार्ग घरापलीकडच्या मेन रोडवरून जातो. तिनं विनंती करून अ‍ॅम्ब्युलन्स आत घ्यायला सांगितली. घरासमोर मिनिटभर थांबली. आम्ही लांबून खिडकीतून संपूर्ण झाकलेल्या आईचं दर्शन घेतलं. नऊ महिन्यांच्या नाळेचा आणि नंतरच्या चौसष्ट वर्षांच्या रक्ताच्या नात्याचा शेवट हा असा झाला.. त्रयस्थासारखा!’’

विश्वासराव विषण्णपणे हसले. डोळे पाणावलेले. काही क्षण शांततेत गेले.

‘‘सॉरी.. हल्ली असंच होतं. स्मशानातून आल्यावर विद्या पार ढासळली. हमसून रडत बसली आजीच्या पलंगाशी बसून एकटीच. आम्ही दोघं घरात असूनही लांब. इतकं रडताना मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. विनय येऊच शकला नाही. आजीचा विश्वास होता म्हणून घाटावर जाऊन, कोविडच्या नियमाप्रमाणे सावधगिरी बाळगत आजीचे दहाव्याचे विधी मुलानं करावेत तसे तिनं एकटीनं केले. अगदी जगावेगळी आहे पोर.. शी इज युनिक! आय सॅल्यूट हर! विद्याच्या बाबतीत आज विचार करताना गुलझार आठवतो.. खूबसुरती सिर्फ औरतके माथेपर लगी बिंदी नहीं, खूबसुरती मेहेनतकश औरतके माथेका पसीना भी हैं!’’

काही क्षण शांततेत गेले. विषय बदलण्यासाठी म्हटलं, ‘‘सध्या त्यांची शाळादेखील बंद असेल ना? की ऑनलाइन शिक्षण चालू आहे?’’

‘‘वा! त्यासाठी तर दोघांची केवढी खटपट. पूर्वीपेक्षा जास्त ‘बिझी’ असतात दोघं. दूरवरच्या खेडेगावात लागणारी इंटरनेट-वायफाय सुविधा, स्मार्टफोन्स, कॉम्प्युटर्स, लागणारा पैसा.. अन् हे अचानक उभं ठाकलेलं, कुठवर चालणार आहे हेदेखील माहीत नसणारं करोनाचं संकट. मुलांसाठी केलेली डिजिटल अ‍ॅप्स आता त्यांना भरपूर उपयोगी पडतायत. दोघांची सतत धडपड चालूच असते. दोघंही त्यांच्या कामात समाधानी असतात. मी दोघांना गमतीनं ‘झंगड’ म्हणायचो. आता कळतंय, आमचं आयुष्य ज्या चौकटीत गेलं, त्या चौकटीत न बसणारे हे खरे..

टू इडियट्स!’’ 

Ref : Loksatta 



No comments:

Post a Comment